Satara Air Show : अवतरला शाैर्याचा थरार; हवाई सामर्थ्याचा अविष्कार

वैमानिकांनी दाखवली कौशल्याची चुणूक; चुकला काळजाचा ठोका
Satara Air Show
Satara Air ShowPudhari
Published on: 
Updated on: 

सातारा : आकाशात विमानांची गर्जना झाली... क्षणार्धात शेकडो नजरा नभांगणाकडे वळल्या... निळ्याशार आकाशाला छेद देत विमाने झेपावू लागली आणि पाहता पाहता साताऱ्याच्या आसमंतात शौर्याचा थरार अवतरला! तो केवळ विमानांचा खेळ नव्हता, तर भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचा, धाडसाचा आणि अजिंक्य इच्छाशक्तीचा जिवंत आविष्कार होता.

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या प्रत्येक झेपेबरोबर सातारकरांच्या मनातील देशभक्तीचा अंगार अधिकच धगधगत होता. सैनिकांच्या पराक्रमाचा वारसा मिरवणाऱ्या साताऱ्याच्या भूमीला शौर्याची भाषा नवी नाही. या मातीत देशासाठी सीमेवर उभे राहणाऱ्या असंख्य जवानांच्या त्यागाच्या कथा रुजल्या आहेत. त्याच सैनिकांच्या साताऱ्याच्या आकाशात गुरुवारी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी आपल्या कौशल्याची अशी काही चुणूक दाखवली की, क्षणभर काळजाचा ठोका चुकावा !

सातारा व परिसर झाला प्रफुल्लीत

सातारकर व परिसरातील नागरिकांसाठी गुरुवारचा दिवस अविस्मरणीय ठेवा ठरला. सैनिकी परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यात संरक्षण मंत्रालयाने 'सूर्यकिरण एअर शो' आयोजित केला होता. या एअर शोमध्ये विमानांच्या चित्तथरारक कवायतींनी सातारा व परिसर प्रफुल्लित झाला. सैनिक स्कूलच्या मैदानावर जिल्ह्यातील १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनीही हा सोहळा ‘आखो देखा’ अनुभवला. साताऱ्याचा गौरवशाली लष्करी वारसा आणि शौर्य परंपरेचा सन्मान करण्यासाठी तसेच २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या वतीने या सूर्यकिरण एअर शो व संचलनाचे आयोजन केले होते. राज्यात पहिला एअरशो देशातील पहिल्या सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावरून पाहताना सारेच थक्क झाले.

खा. उदयनराजेंनी दिली दाद....

सूर्यकिरण एरोबॅटिक विमाने पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने आली त्यानंतर त्यांची हवाई प्रात्यक्षिके सुरू झाली. सुमारे ३५ मिनिटांच्या चित्तथरारक कसरती सुरू होत्या. यावेळी प्रत्येक हवाई प्रात्यक्षिकाला उपस्थितांमधून दाद मिळतच होती. टाळ्या, शिट्ट्या, जल्लोष असा माहोल सैनिक स्कूल मैदानावर सुरू असताना यात खा. उदयनराजेही सामील झाले. विमान आकाशात झेपावताना वैमानिकांनी केलेल्या कसरती पाहून सॅल्यूट मारत टाळ्या वाजवत टोपी हातात घेतांना ते दिसून आले.

वैमानिकांच्या हातात रंगाची उधळण...

एअर शो निमित्ताने रंगीत धुरासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रवामध्ये विशिष्ट रंगद्रव्ये असतात, लाल, हिरवा, निळा अशा रंगाचे द्रव स्वतंत्रपणे वापरता येतात. कोणता रंग किती वेळ सोडायचा, याचे नियंत्रण वैमानिकांकडे असते. त्यामुळे विमानाच्या हालचालीनुसार आकाशात वेगवेगळ्या रंगाचे पट्टे हवाई कसरतीवेळी तयार झाले. विविध रंगी धूर आकाशात दाटल्याचे दिसून आले.

लोहगावमधून ९ मिनिटात साताऱ्यात...

सैनिक स्कूल मैदानावर गुरुवारी भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या एअर शोच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील लोहगाव विमानतळावरून सर्वच्या सर्व ९ विमानांनी टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या ९ मिनिटात विमाने साताऱ्यात गिरट्या घालू लागली. विमानांचा आवाज येताच उपस्थितही आनंदी झाले. सुमारे ३५ मिनिटे या विमानाचा थरार आकाशात सुरु होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.