

सातारा; पुढारी वृत्तसेवा : वळसे, ता. सातारा येथे उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला शॉर्ट सर्किट झाल्याने सुमारे 50 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे 24 शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून, हे सर्वजण हवालदिल झाले आहेत. या नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची मागणी होत आहे.
वळसे येथील माळ, छडू, नारगवंडी शिवारातील उसाच्या फडाला (शनिवार) आग लागली. उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला शॉर्ट सर्किट झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बघता-बघता ऊसाचे फड पेटू लागले. काही क्षणात सुमारे 50 एकरावरील ऊस बेचिराख झाला.
प्रमोद कदम, सचिन कदम, विलास कदम, शिवाजी कदम, रुपाली कदम, निलम कदम, उत्तम कदम, कृष्णा कदम, सरुबाई कदम, उमेश कदम, तुकाराम कदम, मधू शेडगे, उमेश कदम, संतोष कदम, पांडुरंग कदम, धनाची कदम, नवनाथ कदम, गणेश कदम, संदीप कदम, विनोद कदम, काशीनाथ बेलकर, सौ. लिलावती घाडगे, सुभाष कदम, रविंद्र कदम या शेतकर्यांचे या आगीत माठे नुकसान झाले आहे.
जळालेल्या उसाला वजनही कमी येत असून, कारखान्यांकडून दरात टनामागे कपात केली जात आहे. त्यामुळे शेतकर्याला दोन्हीकडून आर्थिक भुर्दंड बसत आहे. कारखान्यांनी जळालेल्या उसाच्या दरात कपात करु नये, अशी मागणी दत्तात्रय कदम (अण्णा) व शेतकर्यांनी केली आहे.
गाळप हंगाप अखेरच्या टप्प्यात आला असतानाही अद्याप जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. कारखाना कार्यस्थळापासून जवळच्या क्षेत्रातील ऊस शेवटी तोडला जातो. त्यामुळे सुमारे पंधरा ते सतरा महिने उभा असल्याने उसाची चिपाडं झाली आहेत. वीज महामंडळाने शॉर्ट सर्किटच्या घटनांना आळा घालण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.