सातारा; पुढारी वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या संगममाहूली येथील कृष्णा- वेण्णा नदीच्या संगमावरील पश्चिमतिरी श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या मागील बाजूस पेशवेकालीन श्रीराम मंदिर आहे. सुमारे 1668 च्या दरम्यान पेशव्यांचे मामा सरदार पेठे यांनी या मंदिराची उभारणी केली.
मंदिरामध्ये तीन फूट उंच पंचमहाधातूंची श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईंची मूर्ती आहे. यातील श्रीराम व लक्ष्मण यांची मूर्ती धनुर्धारी युद्ध स्थितीतील असल्याचे दिसून येते. श्रीराम व लक्ष्मण यांच्या हातातील धनुष्यबाण सुवर्ण असून मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी व हेमांडपंथी आहे. शिखरावर कारागिराने विविध देवदेवतांच्या घडवलेल्या मुर्तीच्या कलाकुसरी केल्या आहेत. सरदार पेठे यांच्यानंतर पुढे चिपळूणकर यांनी मंदिराची देखभाल व धार्मिक विधी पाहिला. त्यानंतर आज अखेर मोहन कौलापूरे हे मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत आहेत. पूर्वी मंदिरात येण्या- जाण्यासाठी केवळ एकच पाऊलवाट होती तर परिसरात दलदल व पडीत जमीन होती. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामधून 90 फुटाची संरक्षण भिंत व मंदिरात जाण्यासाठी रस्ता काँक्रिटीकरण करण्यात आले.त्यामुळे मंदिराचे रूपडे बदलेले आहे.
ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराच्या समोर सभामंडप आणि येण्या जाण्याच्या मार्गावर पत्र्याचे शेड उभारले आहे. रामनवमी, पौर्णिमा या दिवशी मंदिरात ब्रह्मचैतन्य सेवा मंडळाच्या वतीने रामनामजप, महाआरती, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त येथील श्रीराम सेवा मंडळाने संपूर्ण मंदिराची रंगरंगोटी करीत सुशोभीकरण केले आहे. – अजय कदम, खेड