

सातारा : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सातार्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर जोरदार तयारी सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी पावसाने तुफान फडकेबाजी केल्याने या मैदानावर चकांदळ उडाले. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य साठल्याने राडारोडा निर्माण झाला.येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने लाडक्या बहीणी येणार असल्याने प्रशासनाच्यावतीने येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. पावसाने गेल्या आठ दिवसांपासून उघडीप दिल्याने या कार्यक्रमात कोणताही व्यत्यय येणार नाही, असे संकेत मिळत होते. मात्र, शनिवारी सायंकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले. शहर व उपनगरांमध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केले.
सैनिक स्कूल, जिल्हा परिषद, तालीम संघ तसेच छ. शाहू स्टेडियममध्ये पाण्याचे तळे साठून राहिले आहे. या पावसामुळे मैदानावर सर्वत्र पावसाचे पाणी साठले आहे. मैदानावर चालत जायचे झाल्यासही आता चपलांना चिखल लागणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवरांची वाहने कशी नेणार याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. मैदानातील चिखल तुडवतच महिलांना तसेच मान्यवर मंडळींना कार्यक्रमस्थळी यायला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराडला झालेल्या मोदींच्या सभेसारखाच मांडव सैनिक स्कूलच्या मैदानावर घातला गेला असल्याने पाऊस आला तरी महिला भिजणार नाहीत. मात्र, विजांच्या कडकडाट व वादळी वार्यासह रविवारीही पाऊस झाला तर मांडवात पाणी येऊ शकते. या सोहळ्याच्या निमित्ताने महायुतीतर्फे जोरदार तयारी करण्यात आली आहे. सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महिला मेळावे घेऊन सन्मान सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी महिलांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून रविवारी पावसाने उघडीप द्यावी, यासाठी महायुतीचे नेते ‘देव पाण्यात’ घालून बसले आहेत.
सातारा-कोरेगाव रस्त्यावर झेडपी चौकापासून बॉम्बे रेस्टारंटपर्यंत तुफान पावसामुळे रस्त्याकडेला ओढ्याच्या लोंढ्यासारखे पाणी वाहत होते. सैनिक स्कूलच्या कमानीसमोर गुडघाभर पाणी वाहत होते.