

सातारा : सातार्यातील एसटी स्टँड ते खंडोबा माळ असा सुमारे 200 मीटर संशयित रिक्षाचा पाठलाग केल्यानंतर चालकाने मुजोरीगिरी करत महिला वाहतूक पोलिसाला अक्षरश: फरफटत नेले. या घटनेनंतर संतप्त जमावाने रिक्षा चालकाला बदडले. जखमी महिला पोलिसावर उपचार सुरू असून रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. देवराज दीपक काळे (वय 19, रा. मोळाचा ओढा, सातारा) असे त्याचे नाव आहे.
भाग्यश्री जाधव असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिस भाग्यश्री जाधव या एसटी स्टँड परिसरात कर्तव्य बजावत होत्या. यावेळी सातार्यातील ट्रॅफिक पोलिसांना असा मेसेज आला की, मोळाचा ओढा येथे रिक्षा चालकाने काही जणांना उडवले असून तो पसार झाला आहे. तो सातार्याकडे गेला आहे. त्या रिक्षाचा क्रमांकही वाहतूक पोलिसांना मिळाला. संशयीत रिक्षा एसटी स्टँड परिसरात दिसतात भाग्यश्री जाधव यांना चालकाला रिक्षा थांबण्यासाठी हात दाखवला. मात्र चालकाने तशीच रिक्षा पुढे दामटली व तो प्रकाश लॉजच्या दिशेने गेला.
चालक पुढे अपघात करु नये, यासाठी पोलिस भाग्यश्री जाधव यांनी दुचाकीची लिफ्ट घेवून रिक्षाचा पाठलाग केला. खंडोबा माळ येथे त्यांनी पुन्हा रिक्षा चालकाला थांबवण्यास सांगितले. मात्र चालक थांबला नाही. याचवेळी भाग्यश्री जाधव यांचा रेनकोट रिक्षामध्ये अडकला आणि त्या खाली पडल्या आणि अक्षरश: फरफटत गेल्या. तरीही चालकाने रिक्षा थांबवली नाही. नागरिकांनी ही बाब पाहिल्यानंतर ती रिक्षा थांबवली. यावेळी संतप्त जमावाने चालकाला बदडले. तोपर्यंत शहर पोलिस तेथे पोहचले. नागरिकांनी जखमी महिला पोलिसाला बाजूला खासगी रुग्णालयात दाखल केले.
महिला पोलिस पडून रिक्षाच्या पाठीमागील बंपरला अडकल्या असून फरफटत येत असल्याचे रिक्षा चालकाला दिसत होते. तरीही त्याने रिक्षा न थांबवता तशीच दामटली. हे पाहून नागरिक थेट रिक्षासमोरच आले व त्यांनी रिक्षा थांबवली. यावेळी जमाव संतप्त बनला होता. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या रिक्षा चालकाची रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू होती.