

सातारा : सातार्यातील बॉम्बे रेस्टॉरंटजवळ असलेल्या एका चार मजली इमारतीत शनिवारी पहाटे चोरीसाठी घुसलेल्या चोरट्यांचा डाव सतर्क नागरिकांनी वेळीच दाखवलेल्या धाडसामुळे फसला. यावेळी झालेल्या झटापटीत नागरिकांनी एका चोरट्याला पकडून बेदम चोप दिला. तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला एक चोरटा चौथ्या मजल्यावरून पडून जागीच ठार झाला. यादरम्यान पसार झालेल्या एका चोरट्याला पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले. दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात जवान वैभव जाधव हे जखमी झाले. या थरारक घटनेने सातारा शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
इमारतीवरुन पडून ठार झालेल्या चोरट्याचे नाव वेदांत शांताराम अरोडे (वय 23) असे आहे. महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय 25, दोघे रा. मंचर जि.पुणे) असे नागरीकांनी पकडून चोप दिल्याने जखमी चोरट्याचे नाव आहे. तर पोलिसांनी अभिजीत सोमनाथ बिडकर (वय 22, रा.मंचर) याला पकडले आहे. या प्रकरणी प्रकाश बाबूराव घार्गे (वय 52, रा. वास्तू प्लाझा, पिरवाडी, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या बॉम्बे रेस्टॉरंटजवळ असलेल्या चार मजली वास्तू प्लाझा या इमारतीच्या परिसरात तीन चोरटे घुसले. त्यातील एकजण खालीच थांबला तर दोघे इमारतीमध्ये गेले. त्यांनी प्रथम सर्व फ्लॅटच्या दरवाजांना बाहेरुन कडी लावली. त्यानंतर विकास जगदाळे यांचा बंद फ्लॅट फोडून 5500 रुपये चोरले. तसेच निलेश काटकर यांचाही बंद फ्लॅट फोडून 6 ताळे सोने चोरले. यावेळी चोरट्यांच्या हालचालीमुळे काटकर यांच्या लगतच्या फ्लॅटमधील प्रकाश घार्गे जागे झाले. आवाजामुळे बाहेर काहीतरी गडबड असल्याची त्यांना शंका आली. त्यांनी आपला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र घराला बाहेरुन कडी लावल्याचे लक्षात येताच त्यांनी इमारतीमधील इतरांना फोन करुन चोरटे इमारतीमध्ये घुसल्याचे सांगितले.
दरम्यान, याच इमारतीमध्ये राहणार्या जवान वैभव गजानन जाधव यांनाही चोरटे आल्याचा निरोप मिळताच तातडीने हालचाल करत पत्नीच्या मदतीने त्यांनी घराच्या दरवाजाला लावलेली कडी काढली आणि ते बाहेर आले. तसेच इतर फ्लॅटच्याही कड्या काढल्या. यामुळे बहुतांश फ्लॅटधारक बाहेर आले आणि चोरट्यांचा शोध घेऊ लागले. यावेळी चोरट्यांनी नागरीकांवर हल्ला केला. यात जवान वैभव जाधव जखमी झाले, मात्र नागरीकांनी महेश मंगळवेढेकर याला पकडून चोप दिला. यात तो जखमी झाला. तर दुसरा चोरटा पळून गेला.
एका बाजूला ही धांदल सुरु असतानाचा इमारतीच्या टेरेसवर गेलेला वेदांत हा चोरटा पाईपवरुन खाली उतरण्याच्या प्रयत्नात सुमारे 60 फुटावरुन खाली पडला आणि ठार झाला. जोरदार पडल्याचा आवाजाने नागरिकांची आणखी घाबरगुंडी उडाली. खाली येवून काही जणांनी पाहिले असता चोरटा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याचवेळी पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी जखमी चोरट्याला ताब्यात घेतले. त्याने मृत चोरटा साथीदार असून आणखी एक साथीदार पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले. या पळून गेलेल्या चोरट्यालाही पोलिसांनी नंतर पकडले. नागरिकांनी पकडलेल्या तसेच ठार झालेल्या चोरट्याकडे पोलिसांना चोरीचे सोने सापडले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
तिन्ही चोरटे सराईत गुन्हेगार..
तिन्ही चोरटे एकाच दुचाकीवरुन आले होते. मुख्य गेट ऐवजी पाठीमागील बंद असलेल्या गेटने चोरट्यांनी इमारतीमध्ये प्रवेश केला. एक चोरटा खाली व दोन चोरटे इमारतीमध्ये असे नियोजन त्यांनी केले होेते. चोरटे पकडल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ते रेकॉर्डवरील संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे. चोरी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रत्येकावर 2 ते 3 याप्रमाणे 8 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.