Indian Railways : रेल्वे आरक्षण केंद्रांवरही प्रवास विम्याची सुविधा

४५ पैशांत १० लाखांपर्यंतचे विमा संरक्षण : अंमलबजावणी सुरू
Indian Railways |
Indian Railwaysfile photo
Published on: 
Updated on: 

सातारा : रेल्वे प्रवाशांना आता आरक्षण केंद्रांवरून आरक्षित तिकीट काढतानाही ऐच्छिक प्रवास विमा घेता येणार आहे. मध्य रेल्वेने मंगळवार दि. २७ ऑक्टोबरपासून ही सुविधा प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) केंद्रांवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत अवघ्या ४५ पैशांच्या प्रीमियममध्ये प्रवाशांना १० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळू शकणार आहे.

सध्या ही सुविधा आयआरसीटीसीच्या माध्यमातून ऑनलाइन ई-तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. आता प्रत्यक्ष रेल्वे आरक्षण केंद्रांवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विमा घेणे पूर्णपणे ऐच्छिक असून, त्यासाठी प्रवाशांना मोबाईल क्रमांक देऊन डिजिटल पद्धतीने विम्याचे शुल्क भरावे लागेल. या विमा योजनेंतर्गत रेल्वे अपघात किंवा अनुचित घटनेमुळे मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, तर कायमस्वरूपी अंशतः अपंगत्वासाठी ७.५ लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळेल. तसेच दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चासाठी दोन लाख रुपयांपर्यंत आणि मृतदेह वाहतुकीसाठी १० हजार रुपयांपर्यंतची तरतूद आहे.

विमा घेणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पॉलिसीचा तपशील पाठवण्यात येणार आहे. आरक्षण केंद्रांवरील कर्मचारी प्रवाशांना विम्याचा पर्याय निवडण्यासाठी मदत करतील. ही योजना आयआरसीटीसीच्या विद्यमान ऐच्छिक प्रवास विमा योजनेच्या अटी व शर्तींनुसार लागू राहणार आहे. अत्यल्प शुल्कात प्रवासादरम्यान अतिरिक्त आर्थिक सुरक्षा मिळत असल्याने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news