.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
परळी; पुढारी वृत्तसेवा : साताऱ्याच्या पश्चिमेला जोरदार पाऊस असल्याने ठोसेघरसह इतर धवधवे ओसंडून वाहत आहेत. पर्यटनस्थळे बंद असतानाही अनेक अतिउत्साही पर्यटक पर्यटनस्थळी जात आहेत. शनिवारी पुणे (pune girl taking selfie) येथील काहीजण ठोसेघर धबधबा पाहण्यास गेले असताना बोरणे घाटात सेल्फी काढताना नसरीन अमीर कुरेशी (वय २९ रा. वारजे, ता. पुणे) ही युवती ६० फूट खोल दरीत पडली. होमगार्ड व स्थानिकांच्या मदतीने युवतीला वाचवण्यात यश आले असून, तिच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दि. २ ते ४ ऑगस्टपर्यंत पर्यटनस्थळे व धबधबे बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही काही अतिउत्साही पर्यटक मात्र आपला जीव धोक्यात घालून पर्यटनासाठी व धबधब्याकडे जात आहेत. शनिवारी पुण्यातील नसरीन कुरेशी ही तिच्या मित्रपरिवाराबरोबर पर्यटनासाठी सातारला आली होती. साताऱ्यातून दुसरे वाहन करून ते ठोसेघर धबधबा पाहण्यास गेले. मात्र, धबधबा बंद असल्याने ते तेथून माघारी फिरले. माघारी येताना बोरणे घाटातील एका कठड्यावर सायंकाळी ६ च्या सुमारास सेल्फी काढण्यासाठी नसरीन व तिचे मित्र थांबले. सेल्फीच्या नादात नसरीनचा तोल गेला आणि ती ६० फूट खोल दरीत पडली.
या घटनेदरम्यान या मार्गावरुन होमगार्ड अविनाश मांडवे व सागर मदने हे साताराकडे निघाले होते. ही घटना त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत ठोसेघर वनसमितीचे प्रवीण चव्हाण, प्रथमेश जानकर, प्रतिक काकडे, रामचंद्र चव्हाण यांना माहिती दिली. त्यानंतर अविनाश मांडवे यांनी जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्याने खोल दरीत उतरुन युवतीला बाहेर काढले. खोल दरीत पडल्याने युवती जखमी झाली असून तिला उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
घाटात सेल्फी काढताना युवती दरीत कोसळली होती. तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले, तरी या सेल्फीच्या भानगडीबाबत अनेक सुरस कथा चर्चिल्या जात आहेत. बंदी असतानाही पर्यटनाला गेलेल्या या युवतीच्या तिघा मित्रांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, संबंधित युवकांनी 'तो मी नव्हेच' असा पवित्रा घेतला होता. घरात या गोष्टींचा सुगावा लागू नये, यासाठी आटापिटा केल्याचीही चर्चा आहे.
बोरणे घाटातील दरीत कोसळलेली युवती बचावल्यानंतर आता हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले आहे. याप्रकरणी अभिजित मानसिंग देशमुख (वय ३०, रा. समर्थ मंदिर, चौक परिसर, सातारा), रोहन जालिंदर पवार (वय २५, रा. विकासनगर, सातारा) व विकास राजेंद्र येवले (वय २२, रा. संगम माहुली, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस धनाजी वायदंडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी असताना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरणे घाटातील सेल्फी अपघात प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात केवळ युवकांववरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक तीन युवक व दोन युवती होत्या. मित्रांचे हे टोळके एकत्र असताना केवळ मित्रांवरच गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण 'रफादफा' करण्याचा पध्दतशीर प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.