Pudhari Edu Disha | साताऱ्याच्या पिढ्या घडवण्यात ‘पुढारी एज्यु दिशा’चे योगदान; जिल्हाधिकार्‍यांचे गौरवोद्गार

Satara News : मान्यवरांच्या हस्ते गुणवतांचा सन्मान
Pudhari Edudisha
1)‘पुढारी’च्या शैक्षणिक प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी फीत कापताना जिल्हाधिकारी संतोष पाटील, राजेंद्र मांडवकर, डॉ. उद्धव भोसले, राहूल मते, अमित जाधव, राजेंद्र घुले, शितल भुसारे, व्ही. एन. पाटील, अमित उत्तरकर, सागर पालवे, जीवनधर चव्हाण, हरीष पाटणे, मिलिंद भेडसगावकर व इतरPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : पालकांच्या आयुष्यात मुलांचे स्थान महत्त्वाचे असते. या विद्यार्थ्यांच्या करियरला योग्य दिशा मिळावी, यासाठी दै. ‘पुढारी’ आयोजित ‘पुढारी एज्यु दिशा’ या उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय विद्यापीठे व इन्स्टिट्यूट सहभागी झाली आहेत. योग्य करियर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. ‘पुढारी एज्यु दिशा’ या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडल्या आहेत, अशा शब्दांत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गौरवोद्गार काढले.

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा सातार्‍यातील पोलिस करमणूक केंद्रात शुक्रवारी (दि.३०) पार पडला. या कार्यक्रमास दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे राहूल मते, एमआयटी सोलापूरचे अमित जाधव, चाटे शिक्षण समुहाचे राजेंद्र घुले, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे शितल भुसारे, स्मिता जोशी, पीसीइटीचे व्ही. एन. पाटील, एमआयटीचे अमित उत्तरकर, सागर पालवे, भारती विद्यापीठाच्या शितल देशमुख, दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, दै. ‘पुढारी’चे निवासी संपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख मिलिंद भेडसगावकर, पुणे जनरल मॅनेजर सुनील लोंढे, इव्हेंट मॅनेजर राहूल शिंगणापूरकर हे मान्यवर उपस्थित होते.

Pudhari Edudisha
दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. त्यावेळी राजेंद्र मांडवकर, मिलिंद भेडसगावकर,प्रा. व्ही.एन. पाटील, राजेंद्र घुले. Pudhari Photo

संतोष पाटील म्हणाले, दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या ‘पुढारी एज्यु दिशा’ या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडल्या आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढील पिढ्या उज्ज्वल यश संपादन करेल, याची यात्री वाटते. परीक्षा ही विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही होत असते. पालकांच्या आयुष्यात मुलांचे स्थान महत्त्वाचे असते. आई-वडिल व गुरूजन हे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत असतात. शक्य न झालेली स्वप्ने पालक पाहत असतात. डॉक्टर व इंजिनियर हेच पर्याय बहुतांश लोकांना माहिती होते. याच क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा असायचा. करियरबाबत फारशी माहिती नसणारे विद्यार्थी वाट्याला येतील, ते पर्याय स्वीकारायचे. आज अनेक ज्ञानकक्षा विकसित झाल्या आहेत. त्या माध्यमातून चांगले करियर घडवता येवू शकते. आई-वडिलांना प्रतिष्ठेचे जीवनमान मिळवून देऊन चांगल्या पद्धतीचे अर्थार्जन करून देणार्‍या शाखा उपलब्ध झाल्या आहेत. आताची पिढी ‘स्मार्ट’ आहे, असे म्हणतो. पण आपल्याला दिसण्यातला, वागण्यातला की व्यक्तिमत्त्वामधील स्मार्टनेस हवा, हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे. रंगबेरंगी पडद्यावर दिसणारे स्मार्ट आहेत की, चांगले गुण असणारी व्यक्ती. जी त्याचा वापर समाज व देशाच्या विकासासाठी करणारी व्यक्ती स्मार्ट आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे.

‘स्मार्टनेस’ आणण्यासाठी काही गोष्टी आपल्या अंगी बाळगल्या पाहिजेत. आपल्याला काय करायचे आहे, हे आपण पक्क ठरवलं पाहिजे. आपली स्वप्ने मोठी असली पाहिजे. त्यासाठी आपण ‘मेजेरबल’, ‘अ‍ॅटॅनेबल’,रिअ‍ॅलिस्टीक असलं पाहजे. करिअरसाठी समोर ठेवलेले टास्क हे ‘टाईमबाऊंड’ अ‍ॅचिव्ह करण्यासारखे असले पाहिजे. एकच एक पर्याय राहणार नाही, असे शैक्षणिक पर्याय निवडले पाहिजेत. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘पुढारी एज्यु दिशा’मध्ये सर्वाधिक चांगली व वेगवेगळी विद्यापीठे, इन्स्टिट्यूट सहभागी झाली आहेत. त्यांच्याकडील अभ्यासक्रमाची इत्यंभूत माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे. आपला निर्णय चुकला ही वेळ कधीच येणार नाही. खरा व योग्य निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ‘पुढारी एज्यु दिशा’ हा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आत्मविश्वास बाळगणारा विद्यार्थी कधीही अपयशी होत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

राजेंद्र मांडवकर म्हणाले, दै. ‘पुढारी’ शिक्षण क्षेत्राच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवत आहे. या माध्यमातून पंचवीस वर्षे दहावी अभ्यासक्रम मार्गदर्शन केले जात आहे. तीन वर्षांपासून स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात येते. सांगली जिल्ह्यात ४० हजार विद्यार्थ्यांची संगणकावर परीक्षा घेण्यात आली असून सातार्‍यात लवकरच ही परीक्षा घेण्यात येणार आहे. नाशिक, धुळे आणि नंदूरबार या आदिवासी जिल्ह्यात पीसीएटीच्या परीक्षा घेतल्या. या परीक्षेत प्राविण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींशी भेट घडवली. विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद हीच ‘पुढारी’ची शिदोरी आहे. विद्यार्थ्यांनी विविध शाखांमध्ये, अभ्यासक्रमांमध्ये नेत्रदिपक कामगिरी करावी, याच हेतूने दै. ‘पुढारी’कडून ‘पुढारी एज्यु दिशा’ हा उपक्रम राबवण्यात येतो, असेही ते म्हणाले.

हरीष पाटणे म्हणाले, दै. ‘पुढारी’चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सतरा वर्षांपासून ‘पुढारी एज्यु दिशा’ हा ज्ञानयज्ञ सुरू केला आहे. पूर्वीच्या गुरूकूल पद्धतीपासून आताच्या शिक्षणपद्धतीपर्यंत आपण वाटचाल केली. दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांसमोर करियरसाठी मार्गदर्शन मिळत नव्हते. ज्ञानाच्या कक्षा रूंदावत असताना मार्गदर्शनासाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत. एका छताखाली कुठेच अशापद्धतीची व्यवस्था उपलब्ध नव्हती. कोणती शाखा निवडावी, कोणता कोर्स घ्यावा, असे अनेक गोंधळ निर्माण करणारे प्रश्न पालक व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. पालक व विद्यार्थ्यांच्या योग्य मार्गदर्शन मिळावं, यासाठी वाटाड्याची भूमिका घेण्याचा निर्णय दै. ‘पुढारी’चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव यांनी घेतला. दै. ‘पुढारी’ हे सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक खपाचे व प्रभावशाली वृत्तपत्र आहे. वाचकांनी या वृत्तपत्राला उचलून धरले असून पालक व विद्यार्थ्यांकडून मिळणार्‍या पाठिंब्यामुळे ‘पुढारी एज्यु दिशा’ हा उपक्रम लोकप्रिय ठरला आहे. सातार्‍याला समृद्ध शैक्षणिक वारसा वारसा आहे. या प्रदर्शनात पुढील तीन दिवस विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचे या ज्ञानयज्ञाचा करियरसाठी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, युपीएससी परीक्षेत यश मिळवलेले संकेत शिंगटे, प्रणव कुलकर्णी, कपिल नवलडे यांचे पालक तसेच दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन कस्तुरी क्लबच्या इव्हेंट कोर्डिनेटर नेहा बोकिल यांनी केले. यावेळी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pudhari Edudisha
Pudhari Edu Disha | ‘पुढारी एज्यु दिशा’चा खजिना आजपासून खुला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news