सातारा : जिल्हा परिषद शाळेच्या 195 खोल्या धोकादायक; पडझडीबाबत ‘बांधकाम’कडे अहवाल

सातारा : जिल्हा परिषद शाळेच्या 195 खोल्या धोकादायक; पडझडीबाबत ‘बांधकाम’कडे अहवाल

सातारा; प्रवीण शिंगटे :  जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचं काम होत असते. मात्र, या ज्ञानदान करणार्‍या 59 शाळांमधील 195 वर्ग खोल्या धोकादायक बनल्या आहेत. या खोल्या निर्लेखीत करण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाने बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. निधी नसल्याने धोकादायक शाळांच्या खोल्याचे बांधकाम रखडले आहे. मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. दुर्देवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

सातारा जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, खंडाळा तालुक्याच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शाळांच्या इमारती धोकादायक आहेत. छतांना गेलेले तडे, वारा अन् पावसामुळे छताचे तुकडे वर्गामध्ये पडणे, पत्र्याचा जोरदार आवाज येणे, पावसाळ्यात वर्गखोल्या गळणे असे प्रकार या प्राथमिक शाळांमध्ये घडत आहेत. त्यामुळे त्या वर्गावर शिकवणार्‍या शिक्षकांसह हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून तर काही ठिकाणी जिल्हा वार्षिक योजना निधीच्या माध्यमातून शाळांची बांधकामे करण्यात येतात यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र झालेली ही बांधकामे गुणवत्तापूर्ण झाली आहेत का? याची त्रयस्थ यंत्रणे मार्फत तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच बांधकामाची पाहणी करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती आवश्यक आहे. त्याबरोबरच दरवर्षी शाळांचे बांधकाम ऑडीट होणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळांची कमी अधिक प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. मात्र शाळांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बहुतांश शाळांची दुरुस्ती प्रशासनामार्फत करण्यात आली नसल्याने याच धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षण विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी की ठेकेदाराच्या फायद्यासाठी केला जातो असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

अशा आहेत धोकादायक शाळेतील खोल्या…

सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहूली शाळेतील 8, मांडवे 5, काशीळ 7, अंगापूर नं 1 मधील 4 व नं 2 मधील 7, धनवडेवाडी 2, धनवडेवाडी (दरे बु.) 1, वर्णे 5, अतित 2, खंडोबाचीवाडी 2, कोडोली 3, प्रतापसिंहनगर 2, कळंबे 2. कोरेगाव तालुक्यातील बोरजाईवाडी 3, जळगाव 8, करपेवस्ती (चिमणगाव) 1, लक्ष्मीनगर 4, सुलतानवाडी 3, तांबी पु. 3, रेवडी 4, दुघी 3. वाई तालुक्यातील खडकी 2, वेलंग 3, खंडाळा तालुक्यातील पारगाव 4, वाठार बु.3, कराडवाडी 3. फलटण तालुक्यातील सांगवी 5, माळेवाडी (सांगवी) 2, बागेवाडी 3, सावंतवाडी1, तरडफ 3, उपळवे 2. कराड तालुक्यातील वहागाव 6, बेलवडे बु. 8, वराडे 3, हनुमानवाडी 2, वस्ती साकुर्डी 4, आणे 6, साळशिरंबे 6, पाटीलवाडी (शेवाळेवाडी) 2, हणमंतवाडी 2, काटेकरवाडी 2, म्हासोली 1, जुळेवाडी 1. खटाव तालुक्यातील शेळकेवाडी (निमसोड) 2, हिवरवाडी 3, शिरसवस्ती 4, तडवळे 2, डिस्कळ 3, कुरोली सिध्देश्वर 5, कातरखटाव 3. पाटण तालुक्यातील निसरे, उरूल, विरेवाडी, तामिणे. जावली तालुक्यातील महिगाव, कुडाळ, धाकटी काळोशी व महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर येथील शाळेची 1 खोली धोकादायक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news