

सातारा : सातार्यातील पारंगे चौक येथे शनिवारी रात्री 10 वाजता दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. यात शुभम काशीनाथ शिंदे (वय 25, रा. दरे, ता. कोरेगाव) या युवकाचा मृत्यू झाला. मृत युवक मिरज येथील ईसीएस हॉस्पिटल येथे फार्मासिस्ट म्हणून नुकताच रुजू झाला होता. शनिवारी हा अपघात झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पोवई नाका येथून पाण्याचा जार घेऊन एकजण दुचाकीवरून निघाला होता. त्याचवेळी शुभम पोवई नाक्याकडे चालला होता. जार घेऊन जाणारा युवक पारंगे चौकातून सिव्हिल रस्त्याकडे जाण्यासाठी वळण घेत असतानाच दोन्ही दुचाकींचा भीषण अपघात झाला.
शाहूपुरी पोलिसांनी पंचनामा केला. शुभम शिंदे हा फार्मासिस्ट म्हणून नुकताच मिरज येथे रुजू झाला होता. सुट्टी मिळाल्याने तो गावी आला होता. सातार्यातील मित्राला भेटून तो गावी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. शुभम याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.