Yagnyasen Patankar : डॉ. स्मिताताईंच्या पाठीशी पाटणमधील पदवीधर ठाम

याज्ञसेन पाटणकर : भाजपचे मायक्रो प्लॅनिंग, मोठ्या मताधिक्याचे लक्ष्य
Yagnyasen Patankar
येथील बैठकीप्रसंगी याज्ञसेन पाटणकर, विठ्ठल बलशेटवार व इतर मान्‍यवर.
Published on: 
Updated on: 

पाटण : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मतदान पाटण तालुक्यात आहे. या तालुक्यातील पदवीधर मतदारांचा कौल महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या पाठीशी राहतील, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस याज्ञसेन पाटणकर यांनी व्यक्त केला. पाटण तालुक्यातील प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन केले असून डॉ. स्मिता जाधव यांना पाटणमधून मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील हेळवाक, कोयना विभाग, तारळे, चाफळ, सूर्यवंशीवाडी, मल्हारपेठ आणि नाडे या भागांतील मतदान केंद्रनिहाय परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पाटणकर बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, नंदकुमार सुर्वे, चंद्रकांत भिसे आदी उपस्थित होते.

पाटणकर म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पक्षाने नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. पाटण तालुक्यातील प्रत्येक गावातील मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासोबतच जास्तीत-जास्त मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करावे, यासाठी कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

परगावी असलेल्या मतदारांना मतदानासाठी गावी आणण्याचे नियोजनही पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्याबरोबरच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. मतदारांची यादी, मतदान केंद्रनिहाय परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी यांचा समन्वय साधून प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे.

पाटण तालुक्यातील पदवीधर मतदारांचे पाठबळ डॉ. स्मिता जाधव यांना मिळावे आणि त्यांना मोठे मताधिक्य मिळावे, यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत. मतदानाच्या दिवसापर्यंत हे नियोजन कायम ठेवून जास्तीत जास्त मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे पाटणकर यांनी स्पष्ट केले.

१० मतदारांमागे एक कार्यकर्ता...

पाटण तालुक्यात पदवीधर मतदारांसाठी ११ मतदान केंद्रे असून भाजपकडे डॉ. स्मिता जाधव यांच्या समर्थनार्थ ६ हजार मतांचे संख्याबळ आहे. या मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक १० मतदारांमागे एका कार्यकर्त्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली असून गावनिहाय बैठका घेऊन मतदानाबाबत जनजागृती केली जात असल्याचे याज्ञसेन पाटणकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news