

सातारा : ब्रिटिश लेखक जेम्स लेनच्या ‘शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी या पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खा. उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. मनापासून दिलगिरी व्यक्त करत असल्याचे जाहीर निवेदन एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध केले आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून चालवण्यात येते. 2003 मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. यातील काही मजकुरावर आक्षेप घेण्यात आला होता. यासंदर्भात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात पान क्रमांक 31, 33, 34 आणि 93 वर काही आक्षेपार्ह विधाने प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यांची पडताळणी न करता ती प्रसिद्ध केली, असे आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने जाहीर निवेदनात मान्य केले आहे. या चुकीबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते, असे त्यांनी म्हटले आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने एका इंग्रजी दैनिकात जाहीर निवेदन प्रसिद्ध करत माफी मागितली आहे. 2003 मध्ये जेम्स लेनचे पुस्तक प्रकाशित केले होते. यावरून मोठा वादही झाला होता. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब यांच्याबाबत चुकीचे उल्लेख केले होते. त्यावेळी खा. उदयनराजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. याप्रकरणी त्यांनी निषेध व्यक्त केला होता. आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने माफी मागत जाहीर निवेदन जारी केले आहे. पुस्तकातील उल्लेखांची पडताळणी केली गेली नाही. त्या चुकीबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटत आहे. खा. उदयनराजे भोसले आणि जनतेला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असेही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने जाहीर निवेदनात म्हटले आहे.