कोण साकारणार ऑलिम्पिकवीर खाशाबा?.. दिग्दर्शक नागराज मंजुळे अभिनेत्याच्या शोधात

खाशाबा जाधव
खाशाबा जाधव

कराड; प्रतिभा राजे :  कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणार्‍या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या ऑलिम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घेतला असून, याबाबत स्व. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे 'खाशाबा' या सिनेमाचे लिखाण पूर्ण झाले असून, ते सध्या 'खाशाबा'ची दमदार व्यक्तिरेखा साकारणार्‍या अभिनेत्याच्या शोधात आहे. त्यामुळे चरित्रपट असलेल्या या सिनेमात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल उत्सुकता राहणार आहे. सिनेमात खाशाबा जाधव यांच्या व्यक्तिरेखेत प्रस्थापित अभिनेता असेल, की नवा चेहरा ही व्यक्तिरेखा साकारेल हे लवकरच कळेल.

खाशाबा जाधव यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता मंजुळे यांना मिळाला की लवकरच स्व. खाशाबा जाधव यांचे जीवनचरित्र सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार असून, कुस्तीप्रेमींसाठी ही अत्यंत अभिमानस्पद बाब ठरणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या घरी कुस्तीचा वारसा आहे. त्यांचे वडील व भाऊ यांनी कुस्ती मैदाने जिंकली आहेत. कुस्तीमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांचे जीवनचरित्र व त्यांचे योगदान प्रेक्षकांसमोर आणून खाशाबा जाधव यांच्या कुस्तीचे क्षण पुन्हा जिवंत करावेत. त्यातून कुस्तीपटूंना प्रेरणा मिळावी, हा उद्देश असल्याचे दिग्दर्शक मंजुळे यांनी रणजित जाधव यांना सांगितले आहे.

खाशाबा दादासाहेब जाधव (15 जानेवारी 1926 – 14 ऑगस्ट 1984) हे एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील 1952 मधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यामुळे ते प्रसिद्ध आहेत. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. 1900 मध्ये भारतासाठी अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकणार्‍या नॉर्मन प्रिचर्ड यांच्यानंतर खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक खेळाडू होते. ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते.

खाशाबा जाधव यांच्या आधीच्या वर्षांमध्ये भारत फक्त फील्ड हॉकी या सांघिक खेळात सुवर्णपदक जिंकत असे. खाशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही. खाशाबा अत्यंत चपळ होते. ज्यामुळे ते त्यांच्या काळातील इतर पैलवानांपेक्षा वेगळे होते. इंग्लिश प्रशिक्षक रीस गार्डनर यांनी त्यांच्यामध्ये हे वैशिष्ट्य पाहिले आणि 1948 च्या ऑलिम्पिक खेळांपूर्वी त्यांना प्रशिक्षण दिले. खाशाबा जाधव यांनी 1948 सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. 1952 सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 52 किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.

2000 मध्ये, भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचे नाव देण्यात आले. 15 जानेवारी 2023 रोजी गुगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त गुगल डुडलद्वारे सन्मानित केले आहे.

कुस्तीप्रेमींना सिनेमाबाबत उत्सुकता

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. याच कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबत घोषणा केली होती. मंजुळे यांनी रणजित जाधव यांच्याशी संपर्क साधून खाशाबा जाधव यांच्या जीवनचरित्राची माहिती घेतली आहे. आतापर्यंत अनेक चित्रपट वेगवेगळ्या खेळांवर तसंच खेळाडूंवर बनवण्यात आले आहेत. ते बॉक्स ऑफिसवर यशस्वीही झाले आहेत. त्यामुळे आता मराठीच्या मोठ्या पडद्यावर हा सिनेमा कोणते नवे विक्रम करतो, हे पाहणे रंजक ठरेल.

स्व. खाशाबा जाधव यांचा मी वारस आहे, याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या ऑलिम्पिकची दखल मराठी चित्रपट सृष्टीने घेतली याचा अभिमान वाटतो. कोणत्याही सुविधा नसताना खाशाबा जाधव यांनी त्यांचे ध्येय गाठण्यासाठी घेतलेली मेहनत लोकांपर्यंत या चित्रपटाद्वारे जाणार आहे.
– रणजित खाशाबा जाधव

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news