चाफळ : राजकुमार साळुंखे
माजगाव ता.पाटण येथील 100 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेत दोन महिन्यांपासून एकच शिक्षक असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेकडे आपल्या मुलांच्या दाखल्याची मागणी केली आहे. पुरस्कार प्राप्त आदर्श शाळा म्हणूून या शाळेचा गौरव झाला होता. शाळेची मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली आहे. असे असताना शिक्षकच नसतील तर या मॉडेल स्कूलचा उपयोग काय, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. या परिस्थितीला शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
माजगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या पालकांनी दिलेली माहिती अशी की, येथील शाळेची पटसंख्या 100 असून सदर शाळेत 5 शिक्षकांपैकी 4 शिक्षकांच्या दोन महिन्यांपूर्वी बदल्या झाल्या आहेत. मात्र अद्याप एकही नवीन शिक्षक हजर झालेला नाही. एका शिक्षिकेवर शाळा सुरू आहे. कोरोना काळापासून या शाळेला शिक्षकांच्या कमतरतेची झळ विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे शाळेतील 5 वी ते 7 वीतील वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षकांना विनंती बदल्या व आरक्षणाचा फायदा होत असला तरी मुलांचे नुकसान होत आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुकास्तरावर अनेक वेळा शालेय निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. या शिवाय शालेय उपक्रम, योगासन अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे. असे असताना काही दिवसांपासून या शाळेत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख, सुनील शिवदास, अशोक चव्हाण, भाऊसाहेब पवार, अनिल धुमाळ, राजेश पाटील, उज्ज्वला लोहार, संगीता पाटील, विक्रम महिपाल यांनी याबाबतचे निवेदन शिक्षण अधिकार्यांना दिले आहे. शाळेला तातडीने शिक्षक दिले नाही तर शाळेची वाताहत होण्याची शक्यता आहे.
सगळीकडे पालकांनी आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये घालण्याचा सपाटा लावला आहे. माजगाव सारख्या जि.प.शाळेची विद्यार्थी पटसंख्या शंभर आहे. असे असताना देखील शासन या शाळेसाठी शिक्षक वेळेत देऊ शकत नाहीत. त्यामुळेच संतप्त झालेल्या माजगावमधील पालकांनी विद्यार्थ्यांचे दाखले मागितले आहेत. शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे माजगाव जि.प.शाळेत मुले दाखल करण्यास पालक पुढे येणार नाहीत. शिवाय दाखले काढण्यासाठी पालकांची रांग लागेल.भविष्यात अनेक वर्ग बंद करावे लागतील, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.