सातारा कुणाचा? शरद पवार की फडणवीस-शिंदे यांचा ?

Assembly election 2024 : जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघांत राजकीय हालचालींना वेग
Assembly election 2024
सातारा कुणाचा? शरद पवार की फडणवीस-शिंदे यांचा ? File Photo
Published on
Updated on

सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रदीर्घ काळ सातारा जिल्ह्याने शरद पवारांना सोबत केली, अजित पवारांनाही साथ दिली. मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या या बालेकिल्ल्यावर भाजपचा झेंडा फडकवला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा हा जिल्हा असल्याने त्यांनीही जिल्ह्यावर कमांड ठेवली. त्यामुळेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सातारा जिल्हा शरद पवार की देवेंद्र फडणवीस - एकनाथ शिंदे यांना सोबत करेल, याविषयीच्या राजकीय उलथापालथी वेगाने सुरू आहेत. Assembly election 2024

सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व प्रदीर्घ काळ आ. शिवेंद्रराजे भोसले करत आहेत. पूर्वी राष्ट्रवादीतून तर आता भाजपमधून ते आमदार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत ते भाजपमधूनच निवडणूक लढवणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या विजयात शिवेंद्रराजेंचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे विधानसभेला खा. उदयनराजे शिवेंद्रराजेंच्यासोबत राहणार आहेत. शिवेंद्रराजेंच्या विरोधात महाविकास आघाडीमधून दीपक पवार यांच्या नावाची चर्चा आहे. दीपक पवारांनी यापूर्वी अनेकदा शिवेंद्रराजेंना कडवी झुंज दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी शरद पवारांकडे सातारा-जावलीची उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतच उमेदवारीवरून द्विस्ट तयार झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातून माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. तर जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनीही उमेदवारी मागितली आहे. आ. शशिकांत शिंदे यांचीही भूमिका या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची राहणार आहे.

शिवेंद्रराजे लढणारच, पण समोर उमेदवार कोण? याची उत्सुकता सातारा-जावली विधानसभा मतदार संघात आहे. कोरेगावात महेश शिंदे यांच्याविरोधात शशिकांत शिंदेच!

कोरेगाव विधानसभा मतदार संघ गतखेपेसारखाच चुरशीचा राहणार आहे. या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आ. महेश शिंदे निवडणूक रिंगणात असणार आहेत. त्यांच्याविरोधात विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे हेच निवडणूक रिंगणात असतील. महाविकास आघाडीकडे त्यांच्याएवढा तगडा पर्याय सध्या तरी दिसत नाही. आ. महेश शिंदे यांनी कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यांतील कार्यकत्यांचे पक्षप्रवेश घडवत आ. शशिकांत शिंदे गटाला धक्के दिले आहेत. तर शरद पवारांच्या जादूवर आ. शशिकांत शिंदे यांची भिस्त राहणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून दत्ताजीराव बर्गे यांनीही उमेदवारी मागितली आहे. कोरेगावात लोकसभेवेळी काट्याची टक्कर झाली. तशीच टक्कर विधानसभेला होण्याची दाट शक्यता आहे.

वाईत आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात इच्छुकांची खिचडी

वाईत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आ. मकरंद पाटील हे महायुतीतून निवडणूक रिंगणात असणार आहेत. लोकसभेला वाईत 'तुतारी' वाजल्याने आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीतून इच्छुकांची अक्षरशः खिचडी झाली आहे. प्रत्येकालाच आपण आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात निवडून येऊ, असे वाटू लागले आहे. आ. मकरंद पाटील हे महायुतीचे उमेदवार असल्याने महायुतीतील इतर घटक पक्षाला येथे प्रतिनिधित्व मिळणार नाही. त्यामुळे घटक पक्षातील इच्छुक महाविकास आघाडीच्या सान्निध्यात वावरू लागले आहेत. आ. मकरंद पाटील यांचे पारंपरिक विरोधक भाजपचे मदन भोसले यांच्या घरी राष्ट्रवादीचे जयंत पाटील चहा पिऊन गेल्यानंतर जोरदार चर्चा झाली. शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव हेही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. लोणंदचे डॉ. नितीन सावंत, खंडाळ्याचे बंडू ढमाळ, वाईचे कॉंग्रेसचे विराज शिंदे, मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले, अॅड. नीलेश डेरे, माजी उपसभापती अनिल जगताप अशी इच्छुकांची लांबलचक यादी तयार झाली आहे. या सर्व घडामोडीत माजी मंत्री मदन आप्पा पिसाळ यांच्या सूनबाई व माजी जि.प.अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांचे नाव शरद पवार गटाच्या नेत्यांकडून चर्चिले जात आहे. वाई विधानसभा मतदार संघात खंडाळ्याला कधीच संधी मिळाली नाही. त्यामुळे शरद पवार वेगळा डाव खेळणार का? याचीही चर्चा सुरू आहे.

फलटणला खरी लढाई रामराजे विरुद्ध रणजितसिंहच

फलटण विधानसभा मतदार संघ राखीव आहे. त्यामुळे या मतदार संघात उमेदवार कोणीही असले तरी खरी लढाई विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्यातच आहे. रामराजे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आहेत. मात्र, मध्यंतरी त्यांनी 'तुतारी' वाजवण्याची भाषा केली आहे. लोकसभेलाही त्यांच्या समर्थकांनी उघडपणे तुतारीचे काम करून रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या पराभवात वाटा उचलला. या पराभवानंतर रणजितसिंह कमालीचे आक्रमक झाले आहेत. रामराजेंचा उमेदवार पाडायचा या इराद्याने रणजितसिंह कामाला लागले आहेत. त्यामुळे रामराजेंचा उमेदवार कोण त्यावर रणजितसिंह यांचा उमेदवार ठरेल. या मतदार संघात बौद्ध समाजाने आमचाच उमेदवार असला पाहिजे, अशी मागणी केली आहे. सद्यस्थितीत आ. दीपक चव्हाण हे या मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदार संघाचा पुढचा आमदार कोण? याची उत्सुकता.

सातारा जिल्हा उमेदवारीत दडली आहे.माणमध्ये आ. जयकुमार गोरेंविरोधात चक्रव्यूह माण विधानसभा मतदार संघात भाजप तथा महायुतीतून विद्यमान आ. जयकुमार गोरे हेच निवडणूक रिंगणात असतील, त्यांच्याविरोधात विरोधकांनी चक्रव्यूह तयार केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेल्या खेपेला प्रभाकर देशमुख यांनी आमचं ठरलंय टीमच्या माध्यमातून आ. जयकुमार गोरे यांना तगडी फाईट दिली होती. तेव्हा देशमुखांसोबत प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, डॉ. दिलीप येळगावकर, सदाशिवराव पोळ यांचा गट, सुरेंद्र गुदगे अशी मोठी टीम सोबत होती. आता मात्र, बरेच उलटफेर झाले आहेत. काँग्रेसने हा मतदार संघ मागितला आहे. त्यामुळे रणजितसिंह देशमुख यांनी या मतदारसंघावर दावेदारी केली आहे. तर गेल्यावेळी आमचं ठरलंय टीममध्ये पुढच्यावेळी खटाव तालुक्याचा उमेदवार असेल, असा निर्णय झाला होता त्यामुळे प्रभाकर घार्गे यांनीही उमेदवारीची दावेदारी केली आहे. अनिल देसाई यांना गेल्या खेपेला ऐनवेळी थांबायला लावल्याने त्यांनी सातत्याने शरद पवार यांच्या भेटी घेऊन निवडणुकीची तयारी केली आहे. प्रभाकर देशमुख हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीतून इच्छुक आहेत. या सर्वांमध्ये अभयसिंह जगताप या नव्या चेहऱ्याचाही समावेश झाला असून जगतापांनी आक्रमक प्रचाराला प्रारंभ केला आहे. तर आ. जयकुमार गोरे यांना सातत्याने लढत देणारे त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे ठेवणार की काँग्रेसला सोडणार की उद्धव ठाकरे गटाला देणार त्यातून आ.जयकुमार गोरे यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देणार की त्यातही नेहमीप्रमाणे फाटाफूट होणार यावर या मतदार संघाची निर्णायक लढाई होणार आहे.

कराड उत्तरचे उत्तर बाळासाहेबांविरोधात कोण यातच ?

कराड उत्तर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे बाळासाहेब पाटील हेच निवडणूक रिंगणात असतील. महायुतीतून हा मतदार संघ भाजपला जाणार की अजित पवार गटाला याची चर्चा सुरू आहे. भाजपमधून जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व मनोजदादा घोरपडे हे टोकाचे इच्छुक आहेत. या मतदारसंघात गेल्या दोन खेपेला अशीच तिरंगी लढत झाली आहेत. त्याचा फायदा बाळासाहेब पाटील यांना होत आला आहे. या खेपेलाही फारसा बदल त्यात दिसत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची मते या मतदार संघात वाढली आहेत. त्यामुळेच एकास एक लढत झाली तर बाळासाहेब पाटील यांच्यासाठी काट्याची लढाई असणार आहे. मात्र, धैर्यशील कदम व मनोज घोरपडे हे दोघेही थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यातच उदयनराजेंचे समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनीही या मतदार संघात स्वतंत्र मेळावे घेऊन हवा निर्माण केली आहे. उदयनराजेंना या मतदार संघात पडलेली मते हाच कुलदीप क्षीरसागर यांचा बेस असल्याने त्यांनीही निवडणूक लढण्याचे इरादे बोलून दाखवले आहेत. रामकृष्ण वेताळ हेही इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांविरोधात नेमका तगडा उमेदवार कराड उत्तरेत कोण? यावरच उत्तरेचे उत्तर अवलंबून आहे.

Assembly election 2024 : कराड दक्षिण कोणत्या बाबांचे?

कराड दक्षिणेत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्याविरोधात भाजपचे डॉ. अतुलबाबा भोसले अशी सरळ लढत होणार आहे. या मतदार संघात लोकसभेला महाविकास आघाडीची कमालीची पीछेहाट झाली आहे. भाजप व महायुतीचे मतदान वाढल्याने डॉ. अतुल भोसले यांचा गट कमालीचा चार्ज झाला आहे. त्याचवेळी पृथ्वीराज चव्हाणही सावध झाले असल्याने त्यांनी राज्य भाजपच्या व महायुतीच्या कारभारावर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस हा मतदार संघ प्रतिष्ठेचा करणार असल्याने या मतदारसंघात हेवीवेट लढत होईल. त्याचवेळी माजी मंत्री स्व. विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह ठंडाळकर यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह उंडाळकरयांच्याशिवाय शरद पवार यांचा गट हे सगळे एकत्र असतानाही लोकसभेला महायुती प्लस असल्याने विधानसभेला परिस्थिती काय असेल, याविषयी अटकळी बांधल्या जात आहेत.

शंभूराज विरुद्ध पाटणकर

पारंपरिक लढत पाटण विधानसभा मतदार संघात महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात दिसतील. त्यांच्याविरोधात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर हेच उमेदवार असतील, याशिवाय उद्धव ठाकरे गटाचे नेते हर्षल कदम यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. शंभूराज देसाई यांनी मंत्रिपदाचा सर्वाधिक लाभ पाटणला मिळवून दिला आहे. त्या जोरावर ते निवडणूक लढवतील. पाटणकरांसाठी शरद पवार पाटण मतदार संघात जास्त वेळ देण्याची शक्यता आहे. या मतदार संघातील पारंपरिक लढत शंभूराज विरुद्ध पाटणकर अशीच होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news