

पाटण : मल्हारपेठ विभागातील नाडोली, ता. पाटण येथे बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली. या आगीत संसारउपयोगी साहित्य, धान्य, रोख रक्कम जळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे. एकूण 6 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामा मल्हारपेठचे मंडलाधिकारी सर्फराज ढालाईत यांनी केला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.
मिळालेली माहिती अशी, चारही घरातील लोक शेतात गेले होते. या घरांना लागलेली आग ग्रामस्थांनी आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत चारही घरातील कौटुंबिक साहित्य व धान्य जळून खाक झाले होते.
या आगीत दत्तात्रय खाशाबा मंगे यांचे 1 लाख 17 हजार, अरविंद किसन मंगे यांचे 1 लाख 10 हजार, शंकर रामचंद्र मंगे यांचे 1 लाख 80 हजार व दिनकर लक्ष्मण मंगे 2 लाख 47 हजार असे एकूण 6 लाख 54 हजारांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे चार कुटुंबे उघड्यावर पडली असून त्यांना मदतीची गरज आहे.