

सातारा : हिवाळी अधिवेशनात तहसीलदारांचे एकतर्फी केलेले निलंबन तत्काळ मागे घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, कारकून, मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल तसेच शिपाई यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात शेकडो अधिकारी तसेच कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना तहसीलदारांसह संबंधित कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात जिल्ह्यातील 1 हजार 590 महसूल अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
नागरपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार संधी न देता तसेच कोणताही दोष नसताना गौण खनिज प्रकरणात 4 तहसीलदार, 4 मंडलाधिकारी व 2 ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अन्यायकारक पद्धतीने निलंबित केले आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी गौण खनिज उत्खननाबाबत आढळून आलेल्या वस्तुस्थितीला धरून नियमानुसार कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणाबाबत वरिष्ठ कार्यलयासही वेळोवेळी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला आहे. कर्मचाऱ्यांना एकतर्फी निलंबत केल्याने महसूल विभागात तीव्र असंतोष पसरला आहे.
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अन्यायकारकपणे केलेले निलंबत तात्काळ मागे घेऊन त्यांना सन्मानपूर्वक पदस्थापना देण्यात यावी. राज्य संघटनांच्या निर्देशानुसार संबंधितांना न्याय मिळेपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी सामूहिक रजेवर जात असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 75 तहसीलदार व नायब तहसीलदार, 300 लिपिक, अव्वल कारकून, 750 तलाठी व मंडलाधिकारी, 465 कोतवाल असे 1 हजार 590 महसूल अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
तहसीलदार संघटना, राज्य महसूल कर्मचारी संघटना, तलाठी तसेच कोतवाल संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वैशाली राजमाने, उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार (महसूल) शशिकांत जाधव, तहसीलदार (सर्वसाधारण) चंद्रशेखर शितोळे, तहसीलदार (पुनर्वसन) मैमुन्निसा संदे, तहसीलदार (संगायो) रोहिणी शिंदे, सातारा तहसीलदार समीर यादव, कोरेगाव तहसीलदार संगमेश कोडे, जावली तहसीलदार हणमंतराव कोळकर, वाई तहसीलदार सोनाली मेटकरी, खटाव तहसीलदार बाई माने, कराड तहसीलदार कल्पना ढवळे, फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, पाटण तहसीलदार अनंत गुरव, माण तहसीलदार विकास अहिरे, म्हसवड अपर तहसीलदार मीना बाबर, एमएसआरडीसी तहसीलदार अमर रसाळ, नायब तहसीलदार दयानंद कोळेकर, विजयकुमार धायगुडे, सुनील मुनाळे, महेश उबारे तसेच सातारा जिल्हा महसूल खाते वर्ग 3 कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सागर कारंडे, कार्याध्यक्ष संतोष झनकर, राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पारवे, उपाध्यक्ष सुहास अभंग, पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पवार तसेच कोतवाल संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काशिद, सुदर्शन चव्हाण आदि नायब तहसीलदार, लिपिक, अव्वल कारकून, तलाठी, मंडलाधिकारी, कोतवाल, कर्मचारी उपस्थित होते.