पालकमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने धरणग्रस्तांचे पाण्यात उतरून आंदोलन

पालकमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याने धरणग्रस्तांचे पाण्यात उतरून आंदोलन

ढेबेवाडी, पुढारी वृत्तसेवा : तीन महिन्यांहून अधिक काळ कोयना धरणग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. मात्र पाटण तालुक्याचे भुमीपूत्र असलेल्या पालकमंत्र्यांनी आपल्या तालुक्यातील धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. हा धरणग्रस्तांचा अपमान असून त्यांचा निषेध करीत आहोत अशा शब्दांत श्रमिक मुक्तीदलाच्या नेतृत्वाखालील वांग -मराठवाडी धरणग्रस्तांनी धरणस्थळी झालेल्या जाहीर मेळाव्यात निषेध व्यक्त केला.

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांचे फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु आहे. 27 मार्च रोजी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रान्वये श्रमिक मुक्ती दलास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत धरणग्रस्तांच्या मागण्यांसदर्भात बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते. 13 मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरणग्रस्तांच्या शिष्ट मंडळाला येत्या 15 दिवसात मंत्रालयात बैठक घेऊन विचार विनिमय करून निर्णय घेण्याचे अभिवचन दिले होते. पण ते सुद्धा पाळलेले नाही.

त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व धरणस्थळी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानुसार वांग – मराठवाडी धरणस्थळी झालेल्या मोर्चात श्रमिक मुक्ती दलाचे वांग प्रकल्पाचे समन्वयक दिलीप पाटील व सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे दिलीप पाटील यांनी सांगितले. धरणग्रस्तांना जलाशयात उतरून समूहिक शपथ देण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news