सातारा, पुढारी वृत्तसेवा : खा. उदयनराजेंचा स्मारकाला विरोध नाही तर समर्थकांना निवेदन द्यायला कशाला पाठवले? मग तुम्ही काय सगळ्यांनाच खेळवता काय? शंभूराज देसाईंचा वाईटपणा नको म्हणून स्मारकाला विरोध नाही असे सांगतात अन् शिवप्रेमींचा वाईटपणा नको म्हणून तिकडे निवेदने द्यायला लावता. एकाचवेळी सगळ्यांना खेळवायचा प्रयत्न चाललाय का तुमचा? असा टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे यांना लगावला. दरम्यान, पालकमंत्र्यांनी स्व. बाळासाहेब देसाई यांचे स्मारक पोवईनाका सोडून अन्य ठिकाणी उभे करावे, असा पुनरूच्चारही त्यांनी केला.
सातार्यात सर्कीट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. शिवेंद्रराजे यांनी स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाविषयी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातार्यात स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकावरून जो काही प्रकार सुरू आहे तो 'इगो' वॉर आहे. या भूमिकेवर मी ठाम आहे. नगरपालिकेतील सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी शिवतीर्थाचा विषय हाती घेतला आहे. नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर उदयनराजे शिवतीर्थ विषय घेणार नाहीत. भूमाता दिंडीतील एकही गोष्ट राबवली गेली नाही, ती फक्त निवडणुकीसाठी काढली होती, असा टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.
ते म्हणाले, स्व. बाळासाहेब देसाईंनी मोठे काम केले यात दुमत नाही. पालकमंत्र्यांकडून लोकभावनेचा आदर ठेवला जाईल. शिवभक्तांचे म्हणणे विचारात घेवून ते काम करतील. याविषयावर पालकमंत्र्यांना भेटून स्मारक अन्य ठिकाणी उभारावे, अशी मागणी करणार आहे. या प्रश्नातून शंभूराज यांनीच मार्ग काढावा. उदयनराजे व शंभूराज यांच्यात भांडण लावून आम्हाला काय फायदा? असा प्रश्नही आ. शिवेंद्रराजेंनी केला.
तुम्ही एवढे महान कार्य केले की तुम्हाला लोकांनी घरी बसवले…
लोकांच्या विश्वासात आपण असल्याचे उदयनराजेेंचे म्हणणे आहे, या मुद्यावर बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही. तुम्हाला एवढा विश्वास आहे तर मग लोकसभेला नक्की काय झाले? आम्हाला बेअक्कल म्हणता तुम्ही एवढे विद्वान असताना कसे काय पडला? तुम्ही एवढे महान कार्य केले की तुम्हाला लोकांनी घरी बसवले. चार महिन्यात 2 लाख 80 हजारांचे लीड सोडून 80 हजाराने तुमचा पराभव का झाला? असा प्रश्नही आ. शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला.