जावलीत दारूबंदी उठणार नाही : आ. शिवेंद्रराजे

जावलीत दारूबंदी उठणार नाही : आ. शिवेंद्रराजे

मेढा; पुढारी वृत्तसेवा :  दारूबंदी असलेल्या जावली तालुक्यात पुन्हा दारू विक्री सुरू करण्यासाठी हालचाली होत आहेत. या गोष्टीला विरोध असतानाही दारू विक्रेत्यांच्या सोयीसाठी काही राजकारण्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यावर आ. शिवेेंद्रराजे भोसले आक्रमक झाले आहेत. दारू सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांना त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. कोणी कितीही आदळाआपट केली तरी जावली तालुक्यात दारूबंदी उठणार नाही. जे दारू विक्री पुन्हा सुरू करण्यासाठी उठाव करत असतील त्यांना कोणतेही राजकीय व सामाजिक समर्थन मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा आ. शिवेंद्रराजेंनी दिला आहे.

जावली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दारू विक्री सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कुडाळ येथे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या पुढाकाराने त्यासाठी बैठकही झाली होती. या बैठकीला सौरभ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती रवी परामणे, संदीप परामणे, बाजार समिती माजी उपसभापती राजेंद्र शिंदे, सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे, माजी सरपंच विरेंद्र शिंदे व कुडाळ ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी तालुक्यातील दारूबंदी हटवण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आ. शिवेंद्रराजे म्हणाले, जावली तालुक्यातील कुडाळ, मेढा परिसरात अवैध दारूधंद्यावर कारवाई होत नाही. तसेच पर्यटनाला चालना मिळत नसल्याने तालुक्यात पुन्हा दारू दुकाने सुरू व्हावीत, असा सूर काहींनी काढला आहे. जावली तालुका हा माझ्या मतदारसंघातील दारूबंदी झालेला पहिला तालुका आहे. पण आता कुडाळ व मेढा परिसरातील काही भागांत चोरून दारूविक्री होत आहे. यावर कारवाई होत नसल्याने काही लोकांनी येथे दुकाने सुरू व्हावीत, अशी भूमिका घेतली आहे. मुळात ही भूमिका चुकीची आहे. त्यांच्या या भूमिकेला राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळणार नाही. खरेतर व्यसनापासून सर्वांनीच दुर राहिले पाहिजे. व्यसनाला सर्वांचा विरोधच राहणार आहे. त्यांना कोणाचा पाठिंबा मिळेल, असे मला वाटत नाही.

कुणी काहीही प्रयत्न करत असेल तर त्याला राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळणार नाही. तसेच त्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. तालुक्यात दारूबंदी राहिलीच पाहिजे. 16 वर्षापूर्वी ज्या मंडळींनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला तीच मंडळी आता दारू पुन्हा सुरू करा म्हणून पुढे येत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचेही आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले.

दारूबंदीनंतर अवैध दारू किंवा अवैध धंदे बंद करण्यासाठी जी लोकं पुढे आली नाहीत, अशीच मंडळी दारूची दुकाने सुरू करण्यासाठी उतावीळ झाली आहेत. या लोकांनी दारू बंदी मोडीत काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. तो कधीही सफल होवू देणार नाही. दारू विक्री पुन्हा सुरू करणारे सर्वसामान्यांच्या संसारावर उठले आहेत. जावलीच्या महिलांनी लिहिलेला सुवर्ण इतिहास पुसण्याचा प्रयत्न या लोकांकडून होत आहे. ते कदापि होवू देणार नाही.
– विलासबाबा जवळ, मार्गदर्शक व्यसनमुक्त युवक संघटना

जावली तालुक्यात दारू विक्रीसाठी काहींनी मागणी केली ही विनाश काले विपरीत बुध्दी असे म्हणावे लागेल. इतिहासात अशी मागणी करणार्‍यांची नोंद काळ्या अक्षरात लिहली जाईल. दारूच्या व्यसनामुळे तरूण पिढी नासली जात आहे. कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. जावली तालुक्याला दारूबंदीचा मोठा इतिहास आहे. अवैध पध्दतीने जावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू वाढली आहे? हा काय प्रकार आहे. असे म्हणणे म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे हे अपयश आले. जी मंडळी यावर ठराव करत आहेत त्यांचे आर्थिक हितसंबध यात दडले आहेत. याचा भांडाफोड तालुक्यातील महिलाच करतील. याविरोधात महिलांनी एकजूट होवून आडवी बाटली उभी करणार्‍यांना चांगलाच धडा शिकवावा.
-अ‍ॅड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news