वाघनखे खोटी आहेत हे आदित्य ठाकरेंनी सिद्ध करावे : आ. शिवेंद्रराजे

वाघनखे खोटी आहेत हे आदित्य ठाकरेंनी सिद्ध करावे : आ. शिवेंद्रराजे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  आदित्य ठाकरेंनी वाघनख्यांबाबत उपस्थित केलेले प्रश्न हा राजकीय विषय आहे. त्यांच्याकडून मुद्दाम प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जर इंग्लंडहून आणण्यात येणारी वाघनखे ही खरी नाहीत तर आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखे खोटी आहेत, हे सिद्ध करावे, असे आव्हान आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना केले.

दरम्यान, मराठी माणसांची मते केंद्रबिंदू मानून हा वाद करण्याचा प्रकार सुरू आहे. या सर्व प्रकाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दि. 18 नोव्हेंबर रोजी सातार्‍यात या वाघनख्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्हावासियांनी या वाघनख्यांचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही यावेळी आ. शिवेंद्रराजे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना केले.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, ती वाघनखे खरी आहेत व शिवाजी महाराजांनी ती वापरली का? ही गोष्ट आजच समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला कमी लेखण्याचे काम झाले आहे. शिवजयंतीच्या तारखा हाही त्यातीलच एक भाग आहे. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून हे सुरू आहे. अनेक वर्षांपासून भवानी तलवार व वाघनखे परत यावी, ही शिवभक्तांची मागणी आहे. ही मागणी आता लवकरच सत्यात उतरणार आहे. इंग्लंडमधील असणार्‍या संग्रहालयात लुटून नेलेल्या वस्तू कोणाकडून नेल्या हे तिथे लिहलेले नाही. यावरून वाद घालणे योग्य नाही, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.

आ. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, वाघ नखे सातार्‍यात आणण्यासंदर्भात ना. सुधीर मनगुंटीवार यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे. त्यांनी ही वाघनखे महाराष्ट्रात आणल्यानंतर सातार्‍यात आणण्याचा शब्द दिला आहे. सातारा ही स्वराज्याची थोरली गादी असून शिवपराक्रमाची साक्ष देणार्‍या वाघनखांची वाजत गाजत मिरवणूक निघावी. शक्ती व स्फूर्ती स्थान असणार्‍या सातार्‍यात त्याचे दर्शन घेता यावे यासाठी कार्यक्रम होणार आहे. येथे वाघनखांची पूजा व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर ही वाघनखे संग्रहालयात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवली जाणार आहेत. जिल्हावासियांनी याचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही आ. शिवेंद्रराजे यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news