

ओझर्डे : ओझर्डे (ता. वाई) येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला बी.एस्सी. पदवीधर तरुण रोहन राजेंद्र शेलार (वय २१) याचा मृतदेह भुईंज-पांगरा रस्त्यावरील शिवारातील एका विहिरीत आढळून आला.
प्राथमिक तपासात त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने ओझर्डे गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
रोहन हा रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी घराबाहेर पडला होता. बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, तीन दिवसांनंतर ओझर्डे गावच्या हद्दीतील पांगरा शिवारात एका विहिरीत मृतदेह तरंगताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. रोहनच्या मागे आई, वडील, भाऊ आणि आजी असा परिवार आहे.