सातार्‍यातील मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव; राज्य शासनाचा निर्णय

सातार्‍यातील मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव; राज्य शासनाचा निर्णय

खेड; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्याच्या हेल्थ व्हिजनमध्ये माईल स्टोन ठरणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. या निर्णयाचे जिल्हावासीयांनी स्वागत केले असून अनेक दिवस मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या नामकरणावरून होत असलेल्या मागणीला पूर्णविराम मिळाला आहे.

सातार्‍यातील मेडिकल कॉलेज हे जलसंपदा विभागाच्या 25 एकर जागेवर होत आहे. या प्रकल्पासाठी 60 एकर जागा कॉलेजकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मेडिकल कॉलेजच्या विविध इमारतींचा बांधकाम आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी 495 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्न 500 खाटांचे रूग्णालय दिल्ली व बारामतीच्या धर्तीवर सुरू होणार आहे.

सातारा मेडिकल कॉलेज व रूग्णालयाला यापूर्वी थोर महापुरूषांची नावे देण्याची मागणी विविध संघटनानी केली होती. मेडिकल कॉलेजचे काम मार्गी लागल्यानंतर या कॉलेजच्या नामकरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अखेर बुधवारी राज्य शासनाने छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, सातारा असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांनी कार्यवाही करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. ऐतिहासिक सातारा राजधानीला साजेसे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने क्रांतीदिनी घेतल्याने या निर्णयाचे जिल्हावासियांनी स्वागत केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news