Manoj Jarange Patil | आरक्षणासाठी जीव पणाला लावू; मागे हटणार नाही : मनोज जरांगे यांचा एल्गार

मायणीत मराठा सेवकांची विराट सभा
Manoj Jarange Patil | आरक्षणासाठी जीव पणाला लावू; मागे हटणार नाही : मनोज जरांगे यांचा एल्गार
Published on
Updated on

कलेढोण : मराठा समाजाचे रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा समाजाला मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आरक्षणासाठी जीव पणाला लावू; पण कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा आक्रमक इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी दिला.

मायणी येथील कै. शंकरराव पाटील बहुउद्देशीय सभागृहात खटाव, माण व फलटण तालुक्यांतून आलेल्या मराठा सेवकांच्या भव्य सभेत ते बोलत होते. यावेळी तिन्ही तालुक्यांच्या वतीने जरांगे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. मनोज जरांगे म्‍हणाले, मराठा समाज शांत बसला म्हणून त्याच्यावर अन्याय करायचा का? समाजाची परिस्थिती हलाखीची आहे. आमच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे नाहीत. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आता अन्याय सहन करण्याची वेळ संपली आहे. मराठा समाजाच्या एकाही मागणीवर तडजोड केली जाणार नाही, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, मी मराठा समाजाची एकही मागणी शिल्लक ठेवणार नाही. आरक्षणाच्या प्रश्‍नावर कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. आमच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार आहोत. मराठा समाजाचे प्रमाणपत्र जाणूनबुजून रद्द केले जात असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात एवढा मोठा उठाव मी आजपर्यंत पाहिलेला नाही. ही गर्दी केवळ गर्दी नाही, तर मराठा समाजाच्या आक्रोशाची ताकद आहे. हा आवाज आता दाबता येणार नाही, असेही जरांगे-पाटील यांनी ठणकावून सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मायणी येथील चांदणी चौकात जरांगे-पाटील यांचे आगमन होताच जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. जरांगे यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुरज पाटील, संदीप मांडवे, डॉ. विकास देशमुख, अरुण काकडे, विलास सोमदे, कृष्णा सोमदे, दीपक कणसे, रामभाऊ सोमदे, हेमंत जाधव, रणजीत माने, सरपंच सोनाली माने, स्वप्नील घाडगे, हिम्मतराव देशमुख आदी उपस्थित होते. सयाजी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news