आ. महेश शिंदे कृष्णा खोर्‍याचे उपाध्यक्ष

आ. महेश शिंदे कृष्णा खोर्‍याचे उपाध्यक्ष

Published on

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिवसेना – भाजप महायुती सरकारच्या स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे कोरेगावचे आ. महेश शिंदे यांना राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. या निवडीनंतर आ. महेश शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित जलसंधारणाचे काम केले जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली आहे. कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यानंतर कोरेगाव शहरासह सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.

मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. महेश शिंदे यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच पश्चिम महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
2019 मध्ये कोरेगाव मतदारसंघातून नेत्रदीपक विजय मिळवत आमदार झालेल्या महेश शिंदे यांनी अल्पावधीतच आपल्या कामाची चुणूक केवळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दाखवून दिली होती. कोरोना महामारीत स्वत: कुटुंबासह घराबाहेर पडून लोकांचे जीव वाचवले. शासकीय मदतीविना पाच कोरोना सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप केले. कोरेगाव मतदारसंघातील बहुतांशी भाग हा दुष्काळी असल्याने या भागात पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाद्वारे विविध प्रकल्पांची कामे मार्गी लावली. त्यामध्ये प्रामुख्याने गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेचा समावेश आहे.

जलसंधारण, कृषी व पशुसंवर्धन या विषयांमध्ये दांडगा अभ्यास आणि काम करण्याची पद्धती पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी आ. महेश शिंदे यांना देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार मंगळवारी अधिकृतरित्या कॅबिनेट मंत्रीपदाच्या दर्जासह उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोर्‍यात समाविष्ट होणार्‍या प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून जलसंधारणाची कामे केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेले जलसंधारणाचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्यासाठी पावले टाकली जातील. कृष्णा खोर्‍यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवत आणि संवाद साधत कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेतली जातील.सध्या पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती असून योग्यवेळी सरकारने मोठी जबाबदारी सोपविली आहे. सरकारने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत जनतेला दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत, याची दक्षता घेणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news