

महाबळेश्वर : थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेले महाबळेश्वर गारठले आहे. थंडीचा कडाका या पर्यटन स्थळाची नजाकत आणखी खुलवत आहे. जोरदार वार्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना हुडहुडी भरली आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमानाची नोंद 11 अंश नोंदवली गेली आहे. पुढील काही दिवसांत हा पारा आणखी खाली येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून येथील पारा घसरत चालला आहे. शहरी भागापेक्षा सभोवतालच्या भागात थंडीच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. येथील प्रसिद्ध वेण्णालेक, लिंगमाळा परिसरामध्ये तापमानात घट होताना दिसत आहेत. शहरालगतचे ढाबे, हॉटेलच्या बाहेर शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तसेच उबदार कपड्यांच्या खरेदीकडे पर्यटकांचा कल असल्याचे पहावयास मिळत आहे.
महाबळेश्वर परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. थंडीचा कडाका वाढल्याने शहरासह परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरात 11 अंश पर्यंत तापमान घसरले आहे. येथील प्रसिद्ध वेण्णालेक व लिंगमळा परिसरात हेच तापमान आणखी खाली येत असते. वेण्णालेक येथे तापमानाची नोंद घेण्याची यंत्रणा नसल्याने अडचण होत आहे. महाबळेश्वरमध्ये दिवसभर थंडी अनुभवायास मिळत असून, सकाळी-सायंकाळी स्वेटर, शॉल्स सारखी गरम वस्त्रे परिधान करून गुलाबी थंडीचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत. थंडीच्या दिवसातही गरमागरम मकाकाणीस, चहा, भजीवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत.