

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील लोणंद ते शिरवळ रस्त्यावर वीर धरणालगत तोंडल गावच्या हद्दीत दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एका कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात रस्त्यावरील पादचार्यांसह सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे.
सलीम हमीदभाई शिकलगार (वय 45, रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. तर लक्ष्मण भरत माने, विक्रम आनंदा भंडालकर, बाळकृष्ण रामचंद्र कोंढाळकर, विष्णु लक्ष्मण शिरवले, हिराबाई बापू मरळ, छाया विजय देवडे, ताराबाई विठ्ठल देवडे हे जखमी झाले आहेत. सलीम शिकलगार हे आपल्या कार (क्रमांक एमएच-12-एसक्यू-8309) ने काही कामानिमित्त लोणंद येथे गेले होते.
काम आटोपून ते शिरवळकडे परतत असताना तोंडल गावच्या हद्दीत समोरून भरधाव वेगाने येणार्या कारने (क्रमांक एमएच-13-ईसी-1997) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्ता बंद होता. त्यामुळे लोणंदकडे जाण्यासाठी रस्त्यावरून चालत जाणारे काही पादचारीही या धडकेत सापडले. या अपघातात सलीम शिकलगार यांच्यासह तीन महिलांसह एकूण सात जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, सारोळा महामार्ग मदत केंद्राचे पोलीस तसेच शिरवळ रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ग्रामपंचायत रुग्णवाहिका, 108 रुग्णवाहिका व खासगी वाहनांच्या मदतीने शिरवळ व लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सलीम शिकलगार यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून पळून गेल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू केला आहे.