

बामणोली : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सावरी गावच्या हद्दीत सुरू असलेली ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त केली असली तरी या प्रकरणामागचा मास्टरमाईंड नक्की कोण?, मुंबई पोलिस प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खऱ्या गुन्हेगाराची पाळेमुळे खणणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुख्य सूत्रधार म्हणून स्थानिकांकडून ज्याच्याकडे बोट दाखवले जात आहे तो अद्यापही मोकाटच आहे. दरम्यान, राजकीय वरदहस्तामुळे हे प्रकरण दाबले जात असल्याचा संशय असून, कामगारांना अडकवून त्यांच्या बॉसला नामानिराळे ठेवले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
जावली तालुक्यातील बामणोलीजवळील सावरी गावच्या हद्दीतील ‘जळका वाडा’ म्हणून परिचित असणाऱ्या शेडमध्ये मुंबई क्राईम ब्रँचने शनिवारी पहाटे एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा टाकून 115 कोटींचे घबाड जप्त केले. त्यामध्ये 50 कोटींचे साडेसात किलोचे एमडी ड्रग्ज, 38 किलो लिक्विड, अमलीपदार्थ निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व साहित्याचाही समावेश आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली. हे तिघेही परप्रांतीय कामगार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांची नावे पोलिसांकडून अद्याप समोर आणली गेलेली नाहीत.
मुंबई पोलिसांनी कारवाईबाबत कमालीची गोपनियता पाळली होती. यासंदर्भात शनिवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी माध्यमांना कारवाईची माहिती दिली होती. रविवारी मात्र मेढा पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केल्याचे समजते. मेढा पोलिसांनी रविवारी दुपारी बामणोली गावातून वाड्याचे मालक गोविंद शिंदकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर त्यांची चौकशीही झाली. तर या प्रकरणात ओंकार डिगे याची पोलिसांनी त्याच्या मित्रांकडेही चौकशी केल्याचे समोर येत आहे. त्याचे मोबाईल लोकेशन तपासण्याचे कामही सुरू आहे. विशेष म्हणजे, शनिवारी ओंकार डिगे मुंबई पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र दुपारनंतर तो गायब झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रविवारी तो त्याच्या मूळ गावी पावशेवाडी येथे नसल्याचे समोर आले आहे. या संदर्भात सपोनि सुधीर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी सावरी येथून अटक केलेले तिघेजण ड्रग्ज फॅक्टरीतील कामगार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नक्की कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कामगारांना अडकवून सूत्रधाराला मोकाट सोडण्याचे प्रयत्न तर होत नाहीत ना?, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत आहे का?, असे प्रश्न स्थानिकांकडून विचारले जात आहेत.