

सणबूर : कोयना धरणात 101 टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरणातील जलाशयातील जलपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी केले.
कोयना धरणस्थळी झालेल्या जलपूजन कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, कार्यकारी अभियंता महेश रासनकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई यांनी कोयना धरणातील जलाचे विधिवत पूजन करून ओटी भरण केले. ना.देसाई म्हणाले, कोयना धरणास महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या भरभराटीमध्ये, संपन्नतेमध्ये या धरणाचा मोलाचा वाटा आहे. सध्या धरणात 101 टीएमसी पाणीसाठा आहे. पाण्याचा 99000 क्युसेकने विसर्गही सुरू आहे. कोयना धरण हे 100 टीएमसीवर भरल्याने कोयनामाईची अशीच कृपा संपूर्ण महाराष्ट्रावर व्हावी, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र व्हावा, पाण्याची टंचाई भासू नये, मुबलक वीज निर्मिती व्हावी, यासाठी कोयनामाईचे पूजन करण्यात आल्याची भावनाही ना. देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.
कोयना भागातील व पाटण मधील काही कुटुंबांना स्थलांतरण करावे लागले आहे. पोलिस पाटील, तलाठी, मंडलधिकारी, ग्रामसेवक यांना आपल्या गावात थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत.