

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाने थैमान घातले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना, उरमोडी, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, निरा या धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे कृष्णा, कोयना, वेण्णा, उरमोडी, निरा, कुडाळी नद्यांनी धोक्यांची पातळी गाठली असून, वाईच्या प्रसिद्ध महागणपतीला कृष्णामाईचा पुन्हा एकदा चरणस्पर्श झाला. संततधार पावसामुळे अनेक गावे संपर्कहिन झाली असून नदी, ओढ्यावरील छोटे, मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. चिखली, ठोसेघर परिसरात झाड पडल्याने 4 शाळकरी मुले जखमी झाले आहेत. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार वारे व पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. मंंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्वत्रच धुवाँधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शहर व परिसरातील रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहत आहेत. खरीप हंगामातील ऊस, भात पिकाला पाऊस पोषक असला, तरी अन्य पिकांना पाऊस नुकसानकारक आहे.
जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्यांच्या पश्चिम भागातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. जोरदार वार्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 12 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे 87 हजार क्युसेक व पायथा गृहातून 2 हजार 100 क्युसेक असे मिळून 89 हजार 100 क्युसेक विसर्ग कोयना नदीत करण्यात आला आहे.
धोम धरणातून 16 हजार 58 क्युसेक विसर्ग कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे वाई गणपती घाट छोटा पूल, चिंधवली, मर्ढे आनेवाडी पूल, खडकी पूल गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे. कण्हेर धरणातून 11 हजार 707 क्युसेक विसर्ग वेण्णा नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे हमदाबाज किडगाव व करंजे म्हसवे पूल पाण्याखाली गेले आहेत. उरमोडी धरणातून 5 हजार 7 विसर्ग तर तारळी धरणातून 3 हजार 500 क्युसेक विसर्ग, धोम बलकवडी धरणातून 10 हजार 566 क्युसेक, वीर धरणातून 42 हजार 724 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.
कोयना, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, तारळी, कुडाळी नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे नद्यांची पातळी धोकापातळीकडे गेली आहे. पुरामुळे नदी, नाले व ओढ्यावरील छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावे संपर्कहिन झाली आहेत. पावसामुळे सकल भागासह शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ठिकठिकाणी शेतजमीन जलमय झाली असून तळी निर्माण झाली आहेत.
अतिवृष्टीमुळे आज, उद्या शाळा, अंगणवाड्या बंद
सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बुधवार, दि. 20 व गुरुवार दि. 21 ऑगस्ट रोजी पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड तालुक्यातील सर्व शाळा व अंगणवाड्या बंद राहणार असल्याचा आदेश प्रशासनामार्फत काढण्यात आला. कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यातील पर्जन्याची स्थिती पाहून याबाबत तालुकास्तरावर गटविकास अधिकार्यांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे दि. 20 व 21 रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद ठेवण्यात याव्यात. सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची सुरक्षितता घेण्याविषयी पालकांना सूचना देण्यात याव्यात. अत्यावश्यक कामाशिवाय पावसात घरातून बाहेर पडू नयेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालक कल्याण अधिकार्यांनी दिल्या आहेत.