

पाटण; गणेशचंद्र पिसाळ : महाराष्ट्राची वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणातील सिंचनासह निम्म्याहून अधिक राज्यामध्ये प्रकाश देणार्या कोयना जलविद्युत प्रकल्पातील टप्पा एक व टप्पा दोन या पोफळी जलविद्युत निर्मिती प्रकल्पाला 61 तर एक हजार मेगावॅट क्षमतेच्या चौथ्या टप्प्याच्या 21 वा वर्धापनाच्या निमित्ताने भारतीय तंत्रज्ञान व अभियंत्यांचा हा धाडसी प्रयोग राज्याला ऊर्जा देणारा ठरला आहे. भारतीय अभियंत्यांच्या तंत्रज्ञान व बुद्धिमत्तेचा अविष्कार असलेले हे जलविद्युत प्रकल्प आहेत.
कोयना धरणाची निर्मिती मुळातच जलविद्युत प्रकल्पाच्या द़ृष्टीने करण्यात आली. हे धरण बांधताना एका बाजूला पूर्वेकडील प्रदेशात मोठ्या प्रमाणावर असलेली सिंचनाची गरज लक्षात घेण्यात आली त्याचबरोबर धरणात अडवलेल्या पाण्यावर पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती प्रकल्प साकारण्यात आले. एका बाजूला धरणातील पाणी साठवण सुरू झाले आणि त्यासोबतच पश्चिमेकडील प्रामुख्याने चिपळूण तालुक्यात पोफळी, अलोरे, कोळकेवाडी या ठिकाणी कोयना धरणातील पाण्यावर जलविद्युत निर्मितीचे प्रकल्प साकारण्यात आले. कोयनेच्या एकूण चार जलविद्युत प्रकल्पांची तब्बल 1960 मेगावॅट क्षमता असून यातून जवळपास निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला विजेची गरज भागवली जाते. कोयना जलविद्युत प्रकल्प पोफळी टप्पा एक व दोन हा प्रकल्प 16 मार्च
1962 ला कार्यान्वित झाला त्याचा 61 वा वर्धापन दिन साजरा होत आहे.
त्यानंतर कोयना चौथा टप्पा जलविद्युत निर्मिती प्रकल्प साकारण्यात आला. 250 मेगावॅट क्षमतेच्या चार जनित्रांवर चालणारा तब्बल एक हजार हजार मेगावॅट क्षमतेचा कोयना चौथा टप्पा प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या द़ृष्टीने कोयनेचे योगदान हे ऊर्जा व प्रेरणादायी ठरले आहे. जागतिक विचार करायचा झाला तर याच प्रकल्पात धाडसी निर्णय घेण्यात आले. धरणात पाणी असताना लेक टॅपिंगचे तब्बल दोन वेळा प्रयोग करण्यात आले यामध्ये पहिल्या लेक टॅपिंगनंतर कोयना चौथा टप्पा कार्यान्वित झाला. त्यानंतरच्या काळात धरणाची जलपातळी ज्यावेळी 630 मीटरच्या खाली जायची त्यावेळी ऐन उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यातच धरणात पाणी असूनदेखील एक हजार मेगावॅट क्षमतेचा हा चौथा टप्पा बंद पडायचा आणि निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला भारनियमन अथवा अंधाराला सामोरे जावे लागत होते. त्यानंतर धरणात दुसरे लेक टॅपिंग घेण्याचा निर्णय झाला.
अशिया खंडात नावाजलेल्या या लेक टॅपिंगनंतर धरणाची जलपातळी 618 मीटर खाली जाईपर्यंत ही वीजनिर्मिती अखंडित व सुरळीत राहिली. 1960 मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पात पूर्वेकडे धरणातून जे पाणी सिंचनासाठी सोडण्यात येथे त्या पाण्यावर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या धरण पायथा वीजगृहातून 20 मेगावॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे 40 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येते. तब्बल 1920 मेगावॅट वीजनिर्मिती ही पोफळी, कोयना चौथा टप्पा, अलोरे या जलविद्युत प्रकल्पातून केली जाते. पूर्वी कोयना धरणाची साठवण क्षमता 98.78टीएमसी होती मात्र त्यानंतर धरण दरवाजांची उंची वाढवून कोणत्याही पुनर्वसनासह शिवाय कमीत कमी खर्चात तब्बल साडेसहा टीएमसीने धरणाची साठवण क्षमता वाढवली.
धरणात 105.25 टीएमसी पाणी साठवले जाते. या साठवलेल्या पाण्यापैकी पश्चिमेकडील प्रकल्पांसाठी एक जून ते 31 मे या तांत्रिक वर्षासाठी 67.50 टीएमसी पाणी हे पाणीवाटप लवादानुसार वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. पूर्वेकडे सिंचनासाठी पाण्याला कोणत्याही मर्यादा नाहीत. सरासरी वर्षभरात तीस ते पस्तीस टीएमसी पाणी सिंचनासाठी वापरले जाते. त्यातूनही वीजनिर्मिती केली जाते.