पाटण : कोयना धरण तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या 45 दिवसांत प्रचंड पाणीटंचाई व आपत्कालीन परिस्थितीवर मात करत तसेच अनेक दिवस तब्बल 1000 मेगॅवॅट क्षमतेचा कोयना चौथा जलविद्युत निर्मिती टप्पा बंद असतानादेखील आत्तापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत 13.536 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिम वीजनिर्मिती 5.78 तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या 2.77 अशा एकूण 8.55 टीएमसी पाण्यावर 263.188 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. पाणीटंचाईच्या काळात एकीकडे सिंचनासाठी काटकसरीने पाणीवापर करताना दुसरीकडे अशा आव्हानात्मक परिस्थितीतही वीजनिर्मितीची वाटचाल समाधानकारक आहे.