जूनमध्ये कोयना, नवजामध्ये गतवर्षीपेक्षा जादा पाऊस

धरणाच्या शिवसागर जलाशयात जादा पाणी आवक
Koyna Dam
कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालाPudhari File Photo
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यांसाठी वरदायिनी असलेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक जलवर्षाची सुरुवात झाली आहे. जलवर्षाच्या जून या पहिल्याच महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस झाला असून, धरणाच्या शिवसागर जलाशयात जादा पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर वगळता कोयना, नवजा परिसरात ज्यादा पाऊस झाला आहे. धरणातील शिवसागर जलाशयात सध्या 18.80 टीएमसी इतका पाणीसाठा असून 11.58 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

Koyna Dam
शाहूवाडीतील कानसा नदीवरील कांडवण धरण भरले

31 मे 2024 रोजी संपलेल्या मागील तांत्रिक जलवर्षात एकूण 112.63 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. त्यापैकी पश्चिम निर्मितीसाठी 57.22, पूर्वेकडे सिंचनासाठी 38.14, पूरकाळात सोडलेले 2.52, आपत्कालीन (विमोचक) दरवाजातून 7.03, बाष्पीभवन होऊन 6.97 अशा एकूण 111.88 टीएमसी पाण्यानंतरही एक जून रोजी धरणात 18.80 टीएमसी उपलब्ध तर 13.68 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 67.50 टीएमसी पाणी पश्चिम वीज निर्मितीसाठी आरक्षित आहे. यापूर्वी लवादाच्या आरक्षित कोट्यापेक्षा अतिरिक्त पाणी वापरास राज्य शासनाने अनेकदा परवानगी दिली होती. परंतु, मागील जलवर्षात सिंचनासाठी झालेला ऐतिहासिक पाणी वापर लक्षात घेता आता निश्चितच यापुढे सिंचनासाठी कोयनेतील पाण्याचा अधिकाधिक वापर होणार आहे. त्यामुळे पश्चिमेकडील वीज निर्मितीवर पाण्याअभावी मर्यादा येणार आहेत. आता जुलै महिन्यात येथे अपेक्षित पाऊस पडणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे. गेल्या काही वर्षातील इतिहास अभ्यासला असता जुलै महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यानंतरच धरणांतर्गत विभागात अपेक्षित असा दमदार पाऊस पडतो आणि ऑगस्ट महिनाखेरीस धरण पूर्ण क्षमतेने भरते, अशीही परंपरा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news