

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडी आणि त्यामुळे प्रवासाला होणारा विलंब टाळण्यासाठी नव्याने होत असलेला बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. 926 कोटी रुपयांचे हे काम लवकरच पूर्ण झाल्यास कोल्हापूरच्या दिशेने वाहने सुसाट जाणार आहेत. खंबाटकीतील घाटवाटेचा मार्ग हा पुण्याहून सातार्याकडे जाण्यासाठी एकेरी करण्यात आला. तर सातार्याहून येण्यासाठी बोगदा तयार करत स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला. या स्वतंत्र व्यवस्थेमुळे गेली काही वर्षे वाहतूक सुरळीत आणि गतिमान राहिली. मात्र गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहनांमध्ये वाढ झाल्यानंतर हा एकेरी मार्ग आणि बोगदा मार्ग अपुरा पडू लागला.
सध्या पुण्याहून सातार्याकडे जाताना घाटवाटेने जावे लागते. हे आठ किमी अंतर जाण्यास सुमारे 35 ते 40 मिनिटांचा वेळ लागतो. परंतु बर्याचदा अपघात, एखादे वाहन नादुरुस्त होणे किंवा वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीमुळे घाटवाटेतील वाहतूक ठप्प होते. तसेच पुण्याकडे येण्यासाठी जो बोगदा तयार केला आहे. त्यातून येण्यासाठी साधारण 15 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र हा मार्ग सुरू करण्यात आला, त्यावेळी यावरून प्रतिदिन 22 हजार असणारी वाहनांची संख्या आता 55 हजारांवर पोहोचली आहे. या मार्गावरील वाहनांची संख्या वाढल्यानेदेखील कोंडी आणि अपघाताचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले होते.
खंबाटकीच्या नवीन बोगद्यासाठी वेळे गावापासून (ता. वाई) हरिपूर ते खंडाळा दरम्यान 6.3 किलोमीटर लांबीचा नवीन सहापदरी रस्ता होत आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगद्यांचे नियोजन आहे. दोन्ही बोगद्यांचे 1148 मीटरपर्यंतचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. 16.16 मीटर रुंद व सुमारे 9.31 मीटर उंच असणार्या या बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन मार्गीकेचे रस्ते तयार होत असून येथून दुहेरी वाहतूक होणार आहे. बोगद्यातून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गही ठेवला जाणार आहे. अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार होत आहे. बोगदा रस्त्यावर आपत्कालीन रस्ताही बनवला जात आहे. त्याचा उपयोग अपघात प्रसंगी वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे.
धोकादायक एस वळण टळणार...
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या इंग्रजी एस आकाराच्या वळणाचा धोका काढण्यासाठी सुधारित रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. शेकडो प्रवाशांचा बळी घेणारे हे वळण आता कायमचे नाहीसे होणार आहे. बोगदा पूर्ण झाल्यावर येथून दुहेरी वाहतूक सुरू होणार आहे. शिवाय रस्ता सरळ झाल्याने अपघातांची मालिका खंडित होणार आहे.
केवळ टोलवसुली नको... अंधारही दूर करा...
महामार्गावर अपघात घडू नयेत म्हणून काम करावे. तसेच आनेवाडी टोलनाका येथे रोज 43.31 लाख रुपये व खेडशिवापूर येथे 34 लाख 296 रुपये रोज टोल वसुली केली जाते. मात्र, महामार्गावरील अंधार दूर केला जात नाही.