

खेड : सातारा-कोरेगाव मार्गावरील कृष्णानगर येथे गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली होती. यामुळे रस्त्यावर सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे चिखल, निसरडेपणा आणि अपघातांची मालिका सुरू होती. यावर दै. ‘पुढारी’ने आवाज उठवला होता. अखेर याची दखल घेत जीवन प्राधिकरणाने पाणी गळती काढण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
कृष्णानगरच्या दुभाजकाजवळच भर सिमेंटच्या रस्त्यात मुख्य जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. पाण्याच्या लोटांमुळे रस्ता दलदलीत बदलला होता. निसरड्या रस्त्यामुळे गेल्या काही महिन्यांत अनेक दुचाकीस्वार अपघातात जखमी झाले. पाणी वाया जाण्याचे प्रमाणही जास्त होते. लाखो लिटर पाणी सतत रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. रस्त्याच्या कडेला राहुट्या टाकून व्यवसाय करणाऱ्या फुलझाडे विक्रेत्यांनी या पाण्याचा वापर झाडांना करत उर्वरित पाणी पाट काढून रस्त्यात सोडत असल्याने स्थिती अधिकच बिकट झाली होती.
याबाबत ‘पुढारी’ने समस्येचा सातत्याने पाठपुरावा तसेच परखड लेखन केले. याचबरोबर रयतराज संघटनेचे नेते संदीपभाऊ शिंदे यांनी कार्यकारी अभियंत्यांना गुलाबाचे फूल देऊन अनोख्या शैलीत निषेध नोंदवला आणि दोन दिवसांत गळती दुरुस्त न केल्यास रास्ता रोको करू, असा इशारा दिला होता. यानंतर सोमवारी प्राधिकरणाकडून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.