

कराड : कराड शहरात जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांत मारामारी झाली. यात दोन्ही गटांतील सहाजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, पंधरा जणांवर कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 30 नोव्हेंबर रोजी नरसिंह मंदिराजवळ नीलेश माने मित्रांसह उभा असताना वैभव पावसकर काही उमेदवारांविषयी अपशब्द वापरत तेथून निघून गेला. 2 डिसेंबरला काळभैरव मंदिराजवळ त्याने पुन्हा नीलेश माने याला अडवत उद्या घरातून बाहेर काढून मारीन, अशी धमकी दिली. 4 डिसेंबरला रात्री फोन करून पुन्हा धमकी दिली.
नीलेश माने याने त्याला समोर येऊन बोलण्यास सांगितल्यानंतर काही मिनिटांत वैभव पावसकर हा सर्वेश मालंडकर, प्रकाश जाधव, ओंकार पावसकर आणि तेजस जाधव यांना घेऊन नीलेश मानेच्या घराजवळ पोहोचला. त्यांनी नीलेश माने, ओंकार कुलकर्णी आणि
चिन्मय हापसे यांच्यावर हल्ला चढवला. सर्वेश मालंडकरने लोखंडी रॉडने मारहाण केली, तर इतरांनी दांडक्यांनी मारहाण केले. यात ओंकार कुलकर्णीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. चिन्मय हापसे व निलेश माने हेही जखमी झाले. तिघांनाही तातडीने कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान सर्वेश मालंडकर यानेही विरोधात फिर्याद दिली आहे. त्याने फिर्यादीत म्हटले आहे की, 2 डिसेंबरचा वाद निलेश माने यानेच निर्माण केला. 4 डिसेंबरला मिटवण्याच्या नावाखाली त्याला कुंभारवाडा येथे बोलावून लोखंडी रॉड, दांडके व दगडांनी हल्ला केला. यात सर्वेश मालंडकर, तेजस जाधव, प्रकाश जाधव जखमी झाल्याचे म्हटले आहे. दोन्ही बाजुकडील पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारामारीच्या घटनेने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.