

उंब्रज : पाटण-पंढरपूर राज्य मार्गाचे शिवडे ता. कराड गावच्या हद्दीत सुरू असलेले काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. भूसंपादनाचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत शिवडे ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित रस्त्याचे ठेकेदार यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकूण घेतले. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपादित केलेल्या जमिनीची कागदपत्रे तपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले.
पाटण-पंढरपूर राज्य मार्गावरील मल्हारपेठ ते मायणी दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र शिवडे येथील शेतकऱ्यांनी रस्ता रुंदीकरणाच्या कामात होत असलेल्या भूसंपादनाचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याची लेखी तक्रार संबंधित विभागाकडे यापुर्वीच केली आहे. मात्र संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. तसेच स्थानिक शेतकरी, व्यावसायिक, ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. असे असताना संबंधित विभागाने स्थानिकांचा विरोध डावलून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या वर्षभरापासून पाटण-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.
सुमारे 481 कोटींचा निधी रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी मंजूर झाला होता. त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मात्र असे असताना रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई न देता राजरोसपणे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामात शेतालगतची असणारी झाडे व पिके उद्ध्वस्त करून भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र याबाबत शेतकरी व व्यापारी यांना कोणतीही नोटीस अथवा नुकसानभरपाई न देता संबंधित ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून याबाबत ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
मात्र याकडे संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. परिणामी बुधवारी शिवडे येथील शेतकरी यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे शिवडे येथील शेतकरी आशुतोष माळी, संदीप घाडगे, प्रमोद साळुंखे, दीपक माळी, नामदेव घाडगे, हरिदास घाडगे, वैभव जगदाळे, विश्वास माळी आदी शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन रस्ता रुंदीकरणाचे काम बंद पाडले.