

कराड : ग्राहकांच्या जीवाशी सुरू असलेला धोकादायक खेळ अखेर उघड झाला असून, कराड शहर व तालुक्यातील मोठी व नामांकित हॉटेल्स तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिक ठिकाणांवर अन्न व औषध प्रशासनाने मागील १५ ते २० दिवसांत धडक कारवाया केल्या आहेत. वाढत्या महागाईत नागरिकांकडून अधिक पैसे घेऊनही दर्जाहीन, अस्वच्छ व संशयास्पद अन्नपदार्थ विकले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कराडमधील डोमिनोज पिझ्झा आणि पिझ्झा हट या बहुराष्ट्रीय खाद्य कंपन्यांच्या आस्थापनांवर टाकलेल्या छाप्यांत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वच्छतेचा अभाव, महत्त्वाच्या खाद्यतेलाच्या वापराबाबत त्रुटी, तसेच शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकाच ओव्हनमध्ये तयार केल्याचे प्रकार आढळल्याची माहिती समोर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय हॉटेल अलंकार, अल हरम, सागर, न्यू सन्मान, आर. के. बार आणि एन. पी. फिश येथेही छापे टाकण्यात आले. स्वच्छता नियमांना हरताळ फासल्याचे स्पष्ट झाल्याने काही आस्थापनांवर दंडात्मक कारवाईची शक्यता आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तक्रारींसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केले. २०२५-२६ मध्ये ५८ तक्रारी मिळाल्या होत्या. मात्र जून २०२६ पासून आजपर्यंत तब्बल १७९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावरूनच नागरिक जागरूक झाल्याचे समोर येत असून व्यावसायिकांमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे.
मे २०२६ पासून सातारा जिल्ह्यात ५३ धाडी टाकून १.१६ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर ३२ जणांवर गुन्हे, १५ परवाने निलंबित आणि दूध भेसळीची दोन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. मनुष्यबळ, वाहन व एनबीएल प्रयोगशाळेअभावी अडचणी येत असल्या तरी खात्रीशीर तक्रारी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.