

Phaltan Doctor Death Case Update
सातारा : फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर केल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत असताना त्या डायरी (दैनंदिनी) लिहीत असल्याचे समोर आले आहे. क्लास वन अधिकार्यांना तशी दैनंदिनी लिहावी लागते. त्याचप्रमाणे महिला डॉक्टर या देखील दररोजची माहिती लिहीत होत्या. प्रामुख्याने पोस्ट मार्टेम नोट (पीएम नोट) लिहीत असायच्या. ही बाब आता दुर्मीळ असून त्यांच्या या लिखानाच्या सवयीमुळे त्यांच्या डायरीत सगळ्यांचे राज असण्याची शक्यता आहे.
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी हॉटेलमधील खोलीत आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी स्वत:च्या तळ हातावर 25 शब्दांचा मजकूर लिहिल्याने आत्महत्येचे नेमके कारण समोर आले. याशिवाय गेली चार महिने त्यांच्यावर पोलिस, डॉक्टर व राजकारण्यांकडून मेडिकल ऑफिसर असताना कसा दबाव आणला गेला, याबाबतचे तक्रार अर्ज समोर आले आहेत. या तक्रार अर्जामुळे पीडित डॉक्टर या आलेले अनुभव लिहीत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
मयत डॉक्टर या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी होत्या. त्यांनी फलटण शिवाय सातारा जिल्ह्यात इतर ठिकाणीही कमी कालावधीसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. पीडित डॉक्टरसोबत ज्यांनी काम केले आहे त्यांच्याकडून डॉक्टरच्या स्वभावाची, वैद्यकीय सेवा देताना घेत असलेली काळजी याची चर्चा होत आहे. त्या डायरी लिहायच्या हा त्यांचा चांगला गुण असल्याची माहिती समोर आली आहे.
वैद्यकीय क्षेत्रात पोस्ट मार्टेम नोटला (शवविच्छेदन) अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादा मृतदेह रुग्णालयात आल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, अंगावरील जन्मजात खुना व नव्याने काही व्रण, खुना आहेत का? याची सविस्तर माहिती फॉर्ममध्ये भरून पोस्ट मार्टेम केल्यानंतर मृत्यूचे प्राथमिक कारण काय? व्हिसेरा राखून ठेवला आहे की नाही? अशी सविस्तर माहिती लिहिणे बंधनकारक राहते.
पीएम नोट लिहिल्यानंतर तो शासकीय दस्ताऐवज रुग्णालयातच ठेवला जातो. जेव्हा न्यायालयाचे काम असते तेव्हा ते वाचण्यासाठी त्या डॉक्टरांना दिले जाते. अनेकदा वैद्यकीय अधिकार्यांची बदली होत असते. यामुळे पीएम नोट विसरू नयेत. तसेच बदलीच्या ठिकाणावर गेल्यावर तिथे पहिल्या ठिकाणावरील वेळेत माहिती मिळेल न मिळेल यासाठी त्या स्वत:ची एक दैनंदिनी लिहीत होत्या. ही बाब वैद्यकीय क्षेत्रात आता दुर्मीळ झाली आहे. मात्र पीडित महिला डॉक्टरने ती जपली असल्याचे त्यांच्या सहकार्यांनी सांगितले आहे. वैयक्तिक असलेल्या या डायरीमध्ये त्यांनी आतापर्यंत केलेल्या पोस्ट मार्टेमची माहिती आहे. यामुळे त्यामध्ये सगळ्यांचे राज असण्याची शक्यता आहे.