

सातारा : दुष्काळाच्या फेऱ्यात कायम अडकलेल्या कोरेगाव व खटाव तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोरेगाव-सातारा, खटाव तालुक्याच्या जलसिंचन इतिहासात नवा अध्याय सुरू झाला आहे, अशी माहिती आ. महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ. महेश शिंदे म्हणाले, सातत्यपूर्ण व अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यांतील वंचित गावांसाठी 2.15 टीएमसी अतिरिक्त पाणी मंजूर झाले आहे. मूळ जिहे-कठापूर योजना खटाव व माण तालुक्यापुरती मर्यादित असल्याने कोरेगाव तालुका व खटावचा काही भाग लाभापासून वंचित राहिला होता. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेती अडचणीत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन 2014 पासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
योजनेच्या विस्तारीकरणानंतर रामोशीवाडीपासून थेट भाडळेपर्यंत पाणी पोहोचणार आहे. भाडळे तलावात साठवून पुढे बिचुकले-नलवडेवाडी येथील तलावात पाणी सोडले जाणार आहे. पिंपोडे खुर्द, खामकरवाडी, देऊर, बिचुकले, नलवडेवाडी, तळीये परिसराला पाणी मिळणार आहे. या योजनेतून रामोशीवाडी, भंडारमाची, बोधेवाडी, बोरजाईवाडी, शेंदुरजणे, रुई, आझादपूर, अनुभुलेवाडी, होलेवाडी, जांब खुर्द, नागेवाडी, हासेवाडी, चिलेवाडी, भाडळे, कवडेवाडी, हिवरे, मधवापुरवाडी, मदनापुरवाडी, अंबवडे (सं.) कोरेगाव, खडखडवाडी आदी गावांना थेट लाभ होणार आहे. त्यामुळे शेतीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.
आ. शिंदे पुढे म्हणाले, पावसाळ्यात कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी कोरेगाव तालुक्याच्या माथ्यावर साठवले जाणार असल्याने पाण्याचा अपव्यय थांबणार आहे. वांगणा उपसा योजनेतील 2.43 टीएमसी पाणी पूर्ण क्षमतेने उपलब्ध होणार असून धोम डाव्या कालव्यावरील ताण कमी होईल. सेकंडरी सिंचनासाठी 15 एकर क्षेत्राला एक ‘टी’ (चेंबर) देऊन पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. रामोशीवाडीपासून निघणारा उजवा कॅनॉल भाटमवाडी, शेल्टी, खिरखिंडी, एकंबेचा काही भाग, वाघजाईवाडी, जायगाव, अपशिंगे, अंभेरीपर्यंत जाणार आहे. खटाव तालुक्यात मोळ, मांजरवाडी, गारवडी, डिस्कळ, राजापूर, दरूज-दरजाईपर्यंत पाणी पोहोचेल. विसापूरलगत बिटलेवाडी, बुधावलेवाडी, जाखनगाव, जांब या गावांनाही लाभ होणार आहे. सातारा तालुक्यासाठी तासगाव उपसा जलसिंचन योजनेतून तासगाव ते देगाव-कारंडवाडीपर्यंत सिंचन उपलब्ध होईल.