

खंडाळा : कोणी जागा भाड्याने दिल्या तर काहींनी स्वतःच्या जमा पुंजीतून हॉटेल, पानटपर्या उभ्या केल्या होत्या. त्यातून शेतकर्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, रस्ते प्राधिकरणाने कोणतीही पर्वा न करता या हॉटेल व टपर्यांवर दुसर्या दिवशी हातोडा मारत, लाखो रुपयांची गुंतवणूक क्षणात जमिनदोस्त केली. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यामुळे अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. या अतिक्रमण हटाव कारवाईने शेतकर्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
रस्ते प्राधिकरणाकडून खंबाटकी घाटानजीक नवीन दोन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे खंडाळ्यानजीक रस्ता रुंदीकरणात येणारी हॉटेल व छोटे मोठे व्यवसाय करणार्यांना अतिक्रमण काढण्या बाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र संबंधित व्यवसायिकांनी त्याकडे दूर्लक्ष केल्याने प्रशासनाने माणुसकी न दाखवता रस्त्यामध्ये येणार्या इमारती, टपर्या पाडल्या. यामुळे व्यवसायिक व शेतकर्यांना दणका बसला आहे. ज्या शेतकर्यांचे हे अतिक्रमण पाडण्यात आले त्यांच्याकडूनच कवडीमोल दराने 2008 साली जमिनी घेतल्या आहेत.
गेली अनेक वर्षे या ठिकाणी हॉटेल व्यवसायाबरोबर इतर छोटे मोठे व्यवसाय सुरु होते. अनेकांना यामधून रोजीरोटी मिळत होती. मात्र अतिक्रमणाचा हातोडा उगारत तोंडाचा घास हिरावून घेतल्याची भावना व्यावसायिकांमध्ये होती. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी अधिग्रहित जमिनीवर प्राधिकरणाची हद्द निश्चित करताना इमारतींचे नुकसान झाले. त्याबरोबर उभ्या पिकातून बुलडोजर फिरवत चर काढण्यात आला आहे. त्यामुळे डोळ्यादेखत पिक भुईसपाट झाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी तराळल्याचे दिसून आले. नोटीस बजावत एक दोन दिवसाची संधी न देता थेट इमारती पाडल्या. काही जणांनी विनंती करून ही माणुसकी न दाखवता तोंड पाहून कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा आहे.
महामार्गावर असणारा खंबाटकी या ना त्या कारणाने जाम होण्याच्या घटना वारंवार घडतात. अपघातानंतर त्वरित मदत मिळत नाही. अपघात झाल्यास रुग्णवाहिका किंवा क्रेन वेळेवर उपलब्ध होत नाहीत. यामुळे अपघातग्रस्तांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याकडे प्रशासन मात्र कानाडोळा करते. आवश्यक गोष्टींकडे मागणी करून ही दुर्लक्ष होते.परंतु आतिक्रमण हटवण्याच्या कारवाई मध्ये रस्ते प्राधिकरणाकडून तत्परता कशी ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चालक व प्रवाशांची पंचाईत
जुना खंबाटकी टोलनाक्यावर छोटी - मोठी हॉटेल आहेत. पुण्याहून सातार्याच्या दिशेने हॉटेलमधून वेगवेगळे पदार्थ प्रसिद्ध असल्यामुळे सकाळी खवय्ये थांबा घेतात. मात्र, अतिक्रमण हटवल्याने त्या ठिकाणी हॉटेल दिसले नाही. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक यांची पंचाईत झाल्याचे पहायला मिळाले.