सातारा; पुढारी वृत्तसेवा : अपघात झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीवर व त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात होतो. शरीराची हानी तर होतेच, शिवाय उपचाराचा खर्च कोठून करायचा? असा प्रश्नही उभा राहतो. या अडचणी निर्माण होऊ नये यासाठी टपाल कार्यालयाने 795 रुपयांमध्ये टाटा एआयजी आणि बजाज अलियान्झ या दोन विमा कंपन्यांसोबत एकत्रित विमा योजना आणली आहे.
टपाल कार्यालयाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. 18 ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्तीला विमा घेता येतो. टाटा एआयजी आणि बजाज अलियान्झ विमा कंपन्यांची विम्याची वार्षिक रक्कम वेगवेगळी असून, दोन्ही कंपन्यांकडून अपघाती मृत्यू झाल्यास नातेवाईकाला दहा-दहा लाखांचा लाभही दिला जातो.
या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि आधारला संलग्न मोबाईल क्रमांक असायला हवा. शिवाय इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते असणे गरजेचे आहे. कोणत्याही टपाल कार्यालयातून या योजनेचा लाभ घेता येतो. टाटा एआयजीला वार्षिक प्रीमिअम 399 रुपये आणि बजाज अलियान्झला 396 रुपये प्रीमिअम भरावा लागतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला दोन्ही मिळून वर्षाला 795 रुपयांचा हप्ता भरावा लागतो. या योजनेचा सातारा जिल्ह्यातील तब्बल 17 हजार 600 जणांनी लाभ घेतला आहे. तीन वारसदारांना या योजनेअंतर्गत विमा रकमेचा लाभ मिळाला असून टपाल कार्यालयाकडे आणखी 19 प्रस्ताव प्रलंबित आहेत. टाटा एआयजी विमा योजनेचा लाभ खाण कामगार, बांधकाम मजूर, चालक, दिव्यांग, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वकील व त्यांचे कुटुंबीय, पोलीस कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी आदींना घेता येतो. तर बजाज अलायन्झच्या विमा योजनेचा लाभ कोणीही घेऊ शकतो.
अपघात झाल्यानंतर वैद्यकीय खर्चासाठी विमा कंपनीकडे अर्ज करावा लागतो. अर्जात संबंधित व्यक्तीची इत्यंभूत माहिती तसेच रुग्णालयाचा संपूर्ण तपशील नोंदवावा. या अर्जासोबत रुग्णालयाची सर्व मूळ कागदपत्रे जोडून हा अर्ज विमा कंपनीकडे सादर करावा. कागदपत्रे पूर्ण असल्यास तुमचा दावा पंधरा दिवसांत निकाली लागतो; अन्यथा या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. अपघातात मृत्यू झाल्यास दोन्ही कंपन्यांकडून प्रत्येकी दहा-दहा लाख रुपयांचा लाभ मृताच्या कुटुंबातील वारसदारास दिला जातो. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीस प्रत्येकी दहा-दहा लाख रुपये दिले जातात. तर, अर्धांगवायू झाल्यासही तेवढ्याच रकमेचा लाभ मिळतो.