

कराड : पुढारी वृत्तसेवा
मागील आठवड्यात डीपी जैन कंपनीमुळे तब्बल सहा दिवस ऐन पावसाळ्यात कराडकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली होती. ही घटना ताजी असतानाच नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून सुरू केलेल्या जुन्या जॅकवेलची मुख्य विद्युत वाहिनी ठेकेदार डीपी जैन कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तुटली आहे. त्यामुळे संतप्त जमावाने बुधवारी दुपारी जुन्या जॅकवेल परिसरात डीपी जैन कंपनीच्या क्रेन व पोकलेनची तोडफोड करत डिझेल ओतून वाहनांना आग लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र पावसामुळे हा प्रयत्न निष्फळ ठरला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड शहरानजीक कोयनानदीवर सहापदरीच्या कामांतर्गत नवीन दोन उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. हे काम करताना ठेकेदार डीपी जैन कंपनीकडून शहराला पाणीपुरवठा करणार्या कोयना नदीतील नवीन पाणी योजनेची पाईपलाईन रविवार, 14 जुलै रोजी नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे अजूनही नवीन पाणी योजना बंद आहे. ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यास वेळ लागत असल्याने नगरपालिका प्रशासनाने मागील आठवड्यात जुनी पाणी योजना कार्यान्वित केली आहे.
मात्र या कालावधीत शहरातील पाणी पुरवठा ऐन पावसाळ्यात पाच दिवस ठप्प झाला होता. तीन दिवसांपासून जन्या पाणी योजनेतून पाणी पुरवठा एकवेळ सुरू आहे. मात्र या जुन्या पाणी योजनेला वीज पुरवठा करणार्या विद्युत वाहिनीला डीपी जैन कंपनीच्या 85 टन वजनाच्या क्रेनमुळे धोका निर्माण झाला होता. मंगळवारी 85 टनाची उड्डाण पुलाचे सेगमेंट बसविण्यासाठी वापरली जाणारी क्रेन जॅकवेल परिसरातून नव्या पुलाकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विद्युत वाहिनी टाकण्यासाठी काढलेल्या चरीत क्रेन रूतली. त्यानंतर याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. यातच मंगळवारी रात्री जुन्या जॅकवेलला विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी तुटल्याने जॅकवेलला होणारा विद्युत पुरवठा बंद झाला. त्यामुळे बुधवारी सकाळी संतप्त जमावाने जुने जॅकवेल परिसर गाठत या परिसरात रूतलेल्या डीपी जैन कंपनीच्या पोकलेन व मोठ्या क्रेनवर काठ्या घेऊन हल्ला केला. वाहनांच्या काचा फोडल्या. क्रेनच्या टायरवर डिझेल ओतून पेटवून देण्याचाही प्रयत्न जमावाने केला. मात्र मात्र मुसळधार पावसामुळे मोठा अनर्थ टळला. तोडफोड केल्यानंतर जमावाने घटनास्थळावरून पलायन केले. काही वेळातच पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा दाखल झाला होता. सायंकाळपर्यंत घटनास्थळ परिसरात पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.
ठेकेदार कंपनीच्या वाहनांची तोडफोड केल्यानंतर याप्रकरणी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे; तर नगरपालिकेकडून कंपनीविरोधात पाईप लाईनसह विद्युत केबलचे नुकसान केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र मुख्याधिकारी यांनी स्वतः तक्रार द्यावी अशी भूमिका घेत पालिका अधिकार्यांना माघारी पाठवल्याचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी सांगितले.