

कराड : कराड शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी सैदापूरमधील कृष्णा कॅनॉल परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून 19 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दुचाकी, रोख रक्कम तसेच अन्य साहित्य असा सुमारे तीन ते साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात कराड शहर पोलिसांना यश मिळाले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे. कॅनॉल परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचत ही कारवाई करण्यात आली आहे.
रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईनंतर सर्व 19 संशयितांना कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर संशयितांकडे झाडाझडती घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईत दुचाकी, रोख रक्कम पोलिसांच्या हाती लागली असून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने रात्रीपर्यंत अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नव्हता.