

सातारा : सातारा जिल्ह्यात यंदा 15 मेपासूनच धुवाँधार पाऊस कोसळला असून सप्टेंबरच्या मध्यातच जिल्ह्यातील कोयनेसह सर्व धरणे तुडूंब भरली आहेत. त्यामुळे जिल्हा ‘धरंदाज’ म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी जिल्ह्यात मे महिन्यामध्येच पावसाने हजेरी लावली. धरण पाणलोट क्षेत्रात आजही पावसाची संततधार कायम असल्याने वारंवार धरणातील पाणीसाठा नियंत्रीत करावा लागत आहे. त्यामुळे नद्यांना पूरपरिस्थिती कायम होती. बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणेही तुडूंब भरली आहेत. धरणातील पाण्यामुळे शेतीच्या पाण्यासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
कोयना धरणात 105.26 टीएमसी पाण्याची क्षमता आहे. धरणात शनिवारी सकाळी 100 टक्के पाणीसाठा झाला असून धरणातून विद्युतगृहासह सांडव्यामधून 5 हजार 300 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धोम धरणात आजचा 11.690 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे तर धरण 100 टक्के भरले असून धरणातून 505 क्युसेक विसर्ग कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
धोम बलकवडी धरणात आजचा 3.960 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे तर धरण 100 टक्के भरले असून धरणातून 330 क्युसेक विसर्ग कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कण्हेर धरणात आजचा 9.590 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे तर धरण 100 टक्के भरले असून धरणातून 640 क्युसेक विसर्ग कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. उरमोडी धरणात आजचा 9.620 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे तर धरण 99.69टक्के भरले असून धरणातून 250 क्युसेक विसर्ग कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तारळी धरणात आजचा 5.840 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे तर धरण 99.93 टक्के भरले आहे.
मध्यम प्रकल्प असलेला येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी ही धरणे 100 टक्के भरली आहेत. तर मोरणा 97.54 टक्के, उत्तरमांड 68.20 टक्के, महू 79.83 टक्के, हातगेघर 45.53 टक्के, वांग मराठवाडी धरण 72.13 टक्के भरले आहे.