

सातारा : कोल्हापूर येथे झालेला सर्किट बेंच सोहळा सातारा जिल्ह्यातील शेकडो वकिलांनी याची देही याची डोळा अनुभवला. या सोहळ्यासाठी सातार्यातून ट्रॅव्हल्स, कार यामधून शेकडो वकील मंडळी कोल्हापुरकडे रवाना झाली. या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील पक्षकारही आनंदून गेले.
कोल्हापूर, सातारासह सहा जिल्ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच आपल्या परिसरात व्हावे, यासाठी 40 वर्षाहून अधिक वर्षे लढा दिला. आंदोलने, मोर्चे, निवेदने देण्यात आली. याचा परिपाक म्हणजे रविवारी अखेर कोल्हापूर येथे सर्किट बेंचची सुरुवात करण्यात आली. रविवारी झालेल्या या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील वकील मंडळी भल्या पहाटेच कोल्हापूरला रवाना झाली. कार्यक्रमासाठी भव्यदिव्य मंडप उभारण्यात आला होता. कोल्हापुरात जणू दिवाळीचेच वातावरण निर्माण झाले होते. पावसाची रिपरिप असतानाही देखणे आणि नेटके नियोजन केल्याने सहा जिल्ह्यातून आलेल्या वकील मंडळींना त्रासाला सामोरे जावे लागले नाही. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण होते.