सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. बाजारपेठेत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर साहित्य विक्रीस बसलेल्या छोट्या व्यावसायिकांसह व्यापार्यांची तारांबळ उडाली.
गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शुक्रवारी दिवसभर अधूनमधून कडक ऊन व पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. जोरदार पावसामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर व परिसरातील रस्त्यावर छोटे मोठे व्यावसायिक विविध साहित्यांची विक्री करण्यासाठी बसले आहेत. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे साहित्य भिजल्याने त्यांची तारांबळ उडाली.
सध्या जिल्ह्यात सर्वत्र खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. मात्र पावसामुळे शेतात पाणी साचले असल्याने सोयाबीन कापणी व मळणीची कामे खोळंबली आहेत.काढणीस आलेल्या भुईमुगाच्या शेंगांना जास्त पावसामुळे कोंब यायला लागले आहेत. ऊस, भात, आले, हळद पिकास पाऊस चांगला आहे. मात्र आडसाली ऊस पडले आहेत. त्यामुळे उसाला उंदीर लागण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामाची धामधूम सुरू आहे. माण, खटावसह अन्य भागात ज्वारीची पेरणी युध्दपातळीवर सुरु असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. तर काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी शेतीच्या मशागतीची कामे सुरु आहेत.