श्री क्षेत्र गोंदवले (ता. माण) येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी थोरले राममंदिर 1891-1892 दरम्यान बांधले. भक्तांची संख्या वाढत गेल्याने त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून धाकटे राममंदिर गोंदवले येथेच 1894-1895 दरम्यान बांधले. लाखो भाविक दरवर्षी येथे येतात.
श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी श्री क्षेत्र गोंदवले येथे स्थापन केलेल्या पहिले 'थोरले राममंदिर' या मंदिरातच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे वास्तव्य झाले. या मंदिरात शेजारी 'काशी विश्वनाथ' मंदिर स्थापन केले आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे शेजघरही याच परिसरात आहे. गोंदवले येथील संस्थानने 1992 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार व शताब्दी महोत्सव साजरा केला. या मंदिरातील मारुतीची मूर्ती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्वहस्ते बनवून स्थापन केली आहे. माझ्या रामाला एकदा डोळे भरून पाहा, असे महाराज भक्तांना वेळोवेळी सांगत. तेच हे थोरले श्रीराम मंदिर. मंदिरामध्ये असणारा राम केवळ मूर्ती नसून तो प्रत्यक्ष परमात्माच आहे. या भावनेने महाराज वागत. इतरांनाही तसे वागण्यास सांगत. आपल्याला सांभाळणार्या आणि आपल्यावर अत्यंत प्रेम करणार्या वडील माणसाला आपल्या जीवनात स्थान असते तितके स्थान श्री रामरायाला कसे द्यावे, हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी शिकवले.
दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत गेल्यानंतर थोरल्या राममंदिराची जागा अपुरी पडू लागली. त्यावेळी धाकटे राममंदिर बांधले. भाविकांची सोय व्हावी, यासाठी तेथे राहण्यासाठी काही खोल्या बांधल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून या मंदिरात भाविक येतात. तसेच कर्नाटक व मध्य प्रदेशातूनही येतात. श्रीराम जन्मोत्सव सोहळाही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या मंदिरात त्रिकाळ पूजा केली जाते.