सातारा : पुढारी वृत्तसेवा
राजकोटमधील पुतळा दुर्घटना ही दुर्देवी आणि अचानक घडलेली घटना आहे. पुतळा उभारणीतील कच्चे दुवे आणि निसर्गाची अवकृपा यामुळेच पुतळा कोसळला आहे. या घटनेचे कोणी राजकारण करून भांडवल करू नये. यामध्ये कोणालाही टार्गेट करणे टाळावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. दरम्यान, या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. तसेच वातावरणाचा अभ्यास करून त्याच ठिकाणी पुन्हा पुतळा उभारला जावा, अशी अपेक्षाही उदयनराजेंनी व्यक्त केली.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे. राजकोट येथील पुतळा कोसळण्याची दुर्घटना निश्चितच प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायीच आणि निषेधार्ह आहे. तथापि, या घटनेचे भांडवल करणार्यांकडून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्ये होत असतील तर शिवविचारांचा पाईक असणार्या कोणालाच ते मान्य होणार नाही. म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकांनी संयम बाळगला पाहिजे. या घटनेच्या सखोल चौकशी अंती जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन व्हावे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी भव्य पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा दिमाखात उभारला पाहिजे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.